कोरोना विरोधातील युद्ध विज्ञान व सत्याधारित हवे- अझीम प्रेमजी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना साथरोगाचे थैमान सुरूय. जगभरातून आम्हाला मदत मिळतेय. परंतु, कोरोना विरोधातील युद्ध विज्ञान आणि सत्यावर आधारित हवे. तसेच याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेणे देखील आवश्यक असल्याचे प्रतिपादन विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकारातून आयोजित व्याख्यान शृखलेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी अझीम प्रेमजी म्हणाले की, आपल्याला प्रत्येक पातळीवर वेगवान प्रयत्न आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे विज्ञानावर आधारित असले पाहिजेत. तसेच या महासाथीचा सामना करण्यासाठी त्याचा विस्तार आणि प्रादुर्भावाच्या स्तरावर काम करावे लागेल. अशा परिस्थितीत आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र राहावे लागेल. आपल्याला मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. यातच शक्ती आहे आणि जर याचा आपण वेगवेगळं राहून सामना केला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच सर्वात कमकूवत बाबीपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे. याशिवाय कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थिती दु:खद झाली आहे. परंतु तुम्ही गावांकडे पाहा. जे गरीबीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पाहा. सर्वकाही संपलं आहे. हे केवळ या महासाथीमुळे झालं नाही. तर अर्थव्यस्थेवर झालेल्या परिणामुळेही झाले असे प्रेमजी म्हणाले. देशातील गरजवंतांना मूलभूत सुविधांची आवश्यकता असून त्याला प्राधान्य दिले जावे. महासाथीचा सामना केल्यानंतर आपल्याला समाज आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्निमाणाचे काम करावे लागेल. जेणेकरून कोणावरही असमानता किंवा अन्याय होऊ नये, असेही अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी देखील मार्गदर्शन केले.