स्वच्छ पर्यावरण आणि सर्वंकष शाश्वत विकास भारताचा प्रधान कार्यक्रम - पीयूष गोयल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यापार परिषद 2021 ला संबोधित केले. यावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, भारतातील कार्बनडायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रति माणशी प्रमाण हे अन्य आर्थिक महासत्ता असलेल्या देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि असे असूनही, शाश्वत विकास आणि शाश्वत विकासाची ध्येय या संदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2030 च्या कार्यक्रमाला अनुसरून आम्ही भारतात 2030 पर्यंत महत्त्वाकांक्षी 450 गिगावॉट अक्षय्य ऊर्जेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करीत आहोत. गोयल म्हणाले की, आपण सर्वजण खूपच चिंतेत आहोत, याबद्दल काहीच शंका नाही आणि आम्ही हवामानासंदर्भातील आमची उद्दिष्टे गाठण्यासाठी कोविडनंतरच्या जगात नूतनीकरणाच्या जोरावर कार्य करू. ते म्हणाले की, हवामान न्याय संरक्षित केला जावा आणि विकसित देशांनी त्यांच्या वापराच्या पद्धतीवर पुनर्विचार करावा आणि शाश्वत जीवनशैलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
गोयल म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, वनीकरण आणि जैव-विविधता या संदर्भात भारताने बरीच आव्हानात्मक पावले उचलली आहेत आणि म्हणूनच एनडीसीच्या (नॅशनली डिटर्माईंन्ड कॉन्ट्रिब्युशन्स) 2 अंश सेल्सिअसपर्यंत पूरक असणाऱ्या अशा काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ``आंतरराष्ट्रीय सौर मित्रगट आणि आपत्ती निवारण पायाभूत सुविधा यासारख्या जागतिक उपक्रमांना आम्ही प्रोत्साहन दिले आहे. ``
गोयल यांनी व्यापार धोरण आणि आपली हरित उद्दिष्टे वेगळे करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, संपूर्ण जगभरात व्यापारी धोरण हे अधिकाधिक सर्वंकष प्रगतीचे दिसले पाहिजे. ते म्हणाले की, स्वच्छ पर्यावरण आणि सर्वंकष विकास जो शाश्वत आहे, तो भारताचा प्रधान कार्यक्रम आहे. मंत्री म्हणाले की, पर्यावरण आणि शाश्वतता यासंबंधित राबविल्या जाणाऱ्या धोरणांचा संबंध व्यापाराशी जोडला जाऊ नये, दीर्घकाळापासून या धोरणाशी संलग्न अशीच भारताची भूमिका कायम आहे.
गोयल म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघ आणि यूएनएफसीसी यांनी हवामान बदलासंदर्भात केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी जगाला एकत्र आणण्यावर भर दिला पाहिजे. यूएनएफसीसी फ्रेमवर्क आणि पॅरिस कराराच्या अंतर्गत व्यापार वाटाघाटीचा भाग म्हणून नव्हे, तर हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. ही ध्येय साध्य करण्यासाठी व्यापार करार हा पहिला सर्वोत्तम पर्याय होऊ शकत नाही. स्वच्छ पर्यावरणासंदर्भात उचलली जाणारी पावले, याबद्दल संबोधित करताना गोयल म्हणाले की, गेल्या 7 वर्षांपासून, आम्ही 100 टक्के विद्युत जोडणी, 100 टक्के स्वच्छतागृहांची उपलब्धता, 100 आर्थिक सर्वसमावेशकता, आणि आमच्या 100 टक्के लोकसंख्येला स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध व्हावा, यावर लक्ष केंद्रित केले आहे.