तामिळनाडू : एम.के. स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चेन्नई, 07 मे (हिं.स.) : डीएमके पक्षाचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील 33 सहकाऱ्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. द्रमुक नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहमंत्री म्हणूनही शपथ घेतली असून त्यांच्याकडे प्रशासकीय आणि पोलीस सेवा, विशेष योजना आणि सार्वजनिक बांधकाम संस्थाच्या कल्याणकारी योजनांची जबाबदारी देखील असेल. गेल्या 2 मे रोजी झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये द्रमुकने एआयडीएमकेचा पराभव केला. एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात असलेल्या द्रमुकला तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात सहाव्यांदा सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी डीएमके पक्षाने 1967-71, 1971-76, 1989-91, 1996-2001 आणि 2006-11 या काळात राज्याची सत्ता उपभोगली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी द्रमुक आघाडीला 159 जागा मिळाल्या, त्यापैकी 133 द्रमुक, काँग्रेसला 18, व्हीसीकेला 4 तर सीपीएम, सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. त्याचवेळी एआयडीएमके आघाडीला 75 जागा मिळाल्या. त्यापैकी एआयडीएमकेला 66, पीएमकेला 5 आणि भाजपला4 जागा मिळाल्या आहेत.