वाचाळवीरांना आवरा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असोत की राष्ट्रवादीचे मंत्रि नवाब मलिक असोत, यांना मंत्रिमंडळात का घेतले आहे, ते
घेणार्यांनाच माहित. मलिक यांच्याकडे तर काय काम आहे, हे त्यांनाही माहित नसेल. पण हे दोन्ही वाचाळवीर नेहमी वेगवेगळ्या घोषणा करून माध्यमांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःबरोबर राज्य सरकारलाही तोंडघशी पाडतात. त्यातही वडेट्टीवर तर सर्वात पुढे. मागे लोकल लवकरच सुरू होणार, असे त्यांनी जाहिर केल्यानंतर चोविस तासांच्या आत प्रशासनाला तसा काही निर्णय अद्याप झाला नाहि, असा खुलासा करावा लागला होता. गुरूवारी वडेट्टीवर यांनी अगदी ऐटीत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील काही जिल्ह्यातील टाळेबंदी उठवण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली वगैरे अठरा जिल्ह्यांची नावेही दिली. पण त्यांच्या या करणीमुळे काय गोंधळ उडालाय, हे लक्षात आल्यावर हादरलेल्या प्रशासनाने लगेचच पत्रक प्रसिद्ध करून टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्याचा केवळ निर्णय तत्वतः झालाय. अद्याप त्याच्या अमलबजावणीबाबत काहीही निर्णय झालेला नाहि, असे जाहिर करावे लागले. यात महाविकास आघाडी सरकारचे पुरते हसू झाले. वास्तविक आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याने टाळेबंदीसारख्या महत्वाच्या निर्णयाबाबत घोषणा का करावी, हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. टाळेबंदीमुळे लोकांचे काय हाल झाले आहेत, ते सार्यांना माहित आहे. राज्यातील लाखो लोकांच्या रोजीरोटीशी निगडित असा हा मुद्दा आहे. इतक्या संवेदनशील मुद्यावर जपून बोलले पाहिजे, ही जाणिव तर प्रत्येकाला पाहिजे. परंतु वडेट्टीवार असो की मलिक, यांना
बोलघेवडेपणाची इतकी हौस आहे की ते उगाचच माध्यमांसमोर येऊन घोषणा करत असतात. वडेट्टीवार यांनी नंतर जो खुलासा केला तो तर त्यांच्या मूळ घोषणेपेक्षाही भयानक आहे. त्यांनी म्हटले आहे की, विमान पकडायच्या गड़बडीत तत्वतः शब्द वापरायला विसरलो. माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीला तत्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले तेव्हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांची या शब्दावरून वारंवार खिल्ली उडवली होती. आता ते स्वतः तोच शब्द वापरून निर्णयापासून लांब पळत आहेत. ते असो. पण वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे. तेही एकदा नाहि तर अनेकदा. मुळात काँग्रेसला सत्ता मिळाली, ती केवळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पावसातील केलेल्या प्रचारसभेमुळे. त्यामुळे काँग्रेसने आपल्याला मंत्रिपदे मिळाली आहेत, ती केवळ पवारांची कृपा आहे, हे कायम लक्षात ठेवलेले बरे. वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांमुळे लोकांमध्ये सुरूवातीला प्रचंड आशा निर्माण झाली आणि नंतर प्रशासनाने म्हणजे मुख्यमंत्रि कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाने त्यांच्या आशांवर पाणी फेरले. असा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकाकर कुणालाच दिला नाहि. काँग्रेसचा या सरकारची सत्ता आणण्यात काडीचाही वाटा नाहि. तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी निमूटपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी. तरच त्यांची गेलेली पत पुन्हा मिळू शकेल. काँग्रेसचे
नेते तर निवडणूक लढवण्यासही घाबरत होते. त्यांना अचानक स्वप्नातही नसताना लॉटरी लागली ती शिवसेनेने आपली भूमिका बदलल्यामुळे. त्यामुळे काँग्रेसने आपल्याला जे मिळाले आहे त्यात आपले श्रेय काहीच नाहि, हे समजून संयमीपणे वागले पाहिजे. उलट काँग्रेसचेच मंत्रि जास्त बालिशपणाच्या हालचाली करताना दिसतात. त्यातल्या त्यात बाळासाहेब थोरात हेच काय ते संयमी नेतृत्व काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील तीन सत्ताधारी पक्षांमध्ये साधा समन्वयही नाहि, हे यानिमित्ताने पुन्हा उघ़ड झाले आहे. तसे ते अनेकदा समोर आले आहे. एखाद्या पक्षाचा मंत्रि एक निर्णय जाहिर करतो आणि नंतर दुसरा मंत्रि तोच निर्णय रद्द करतो. हेच या सरकारचे वैशिष्ट्य आहे. एरवीच्या राजकारणाच्या विषयांवर असे झाले तर ते समजता येईल. त्यात जनतेचा प्रत्यक्ष संबंध नसतो. परंतु टाळेबंदी उठवण्यासारखा विषय जो जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे, त्या विषयातही इतका ढिसाळपणा, समन्वयाचा अभाव आणि वाचाळवीरांची लुडबुड यामुळे अगोदरच अवघड अवस्थेत चाललेल्या सरकारची नौका बुडायला वेळ लागणार नाहि. टाळेबंदी उठवण्याबद्दल केवळ विचार सुरू आहे आणि निर्णय झालेला नाहि, असे मुख्यमंत्रि कार्यालयाने प्रसिद्ध केल्यावर लाखो दुकानदार आणि नागरिकांची किती घोर निराशा झाली असेल, याची कल्पना वडेट्टीवार किंवा प्रशासनात बसलेल्या अधिकार्यांना येणार नाहि. काँग्रेसच्या मंत्र्यांना तसेही सरकारमध्ये करण्यासारखे काही नाहि. कारण त्यांच्याकडे महत्वाचे एकही खाते नाहि. सारी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांना उगीचच बोलून प्रकाशात रहाण्याची हौस जडली आहे. परंतु त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का अनेकवेळा बसला आहे. त्यामुळे आता महाविकास सरकारच्या तारणहार पवारांनाच या वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा लागेल. अशा नेत्यांना तोंड आवरण्यास सांगितले पाहिजे. भाजप शिवसेना सरकारमध्येही असेच वाचाळवीर होते. काँग्रेसने त्यांच्यापासून धडा घ्यावा.