लवकरच राज ठाकरेंना भेटणार, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं 'राज'कारण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर, आज पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगत सूचक वक्तव्य केलं आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. मी ती क्लीप शांतपणे ऐकली, त्यामध्ये उत्तर भारतीय पुरोहितांनीही राज यांचा सत्कार केला आहे. ही क्लीप पाहिल्यानंतर त्यातील मुद्द्यावर चर्चा करायची आहे. त्यासाठी, नजीकच्या काळात मी राज ठाकरेंना भेटणार, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.युती करायची असल्यास मला केंद्राशी बोलावं लागेल. तसेच युती करण्यासाठी मला आमचे पक्ष कार्यकर्ते, सहकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागेल. मी भाषणाची क्लीप पाहिली, त्यातील काही बाबींवर मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यामुळे, मी भेटून त्यांच्याशी चर्चा करेन, असे पाटील यांनी सांगितले. मी टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे, क्लीप ऐकल्यानंतर काही चर्चेचे विषय आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलीय, असेही पाटील यांनी म्हटले आहे.