एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोनामुळे लागलेले निर्बंध, त्यामुळे दुरावलेले प्रवासी, त्यातच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तारीख उलटूनही वेतन हाती आलं नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.