ममतांची तयारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ममतांची तयारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रि ममता बॅनर्जी या गेल्या आठवड्यात दिल्लीत होत्या. त्यांची ही भेट अनेक अर्थानी महत्वाची आणि राजकीय होती. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच त्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही भेटल्या. भाजपचा आपल्या राज्यात पराभव करून पुन्हा तिसर्यांदा मुख्यमंत्रि झाल्याने त्यांच्या या दिल्ली  भेटीला निश्चितच राजकीय अर्थ होता. ममता यांच्याकडे पंतप्रधान मोदींना पर्याय म्हणून इतर पक्ष पहात आहेत. त्या त्यासाठी लायक आहेत की नाहि, हा वेगळा प्रश्न आहे. याबद्दल प्रत्येकाचे स्वतंत्र मत असू शकते. परंतु ममता यांनी दिल्ली भेटीतून आपणही दोन हजार चोविसमध्ये मोदींना पर्याय म्हणून समोर येण्यास तयार आहोत, याचे पुरेसे संकेत ममतांनी दिले आहेत. मोदींना शक्तिशाली पर्याय म्हणून विरोधी पक्षांना द्यायचे असेल तर केवळ ममतांचे नावच घ्यावे लागेल. कारण इतर नेत्यांमध्ये तेवढी पात्रता नाहि असे नाहि तर त्यांची राजकीय ताकद कमी पडते आहे. राहुल गांधी यांच्या बाबतीत तर त्यांच्याच पक्षाला विश्वास वाटत नाहि. अर्थात हा वेगळा विषय आहे. परंतु ममतांनी या स्पर्धेत आपलीही हॅट फेकली आहे, हे मात्र निरपवाद आहे. ममता बॅनर्जी या मोदींना टक्कर देऊ शकणारा सक्षम विरोधी नेत्याची रिकामी जागा भरून काढू शकतात, असे त्यांचे त्यानाच वाटू लागले आहे. त्या राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधी नेत्याची असलेली पोकळी भरून काढण्यास तयार असल्याचे संकेत ममतांनी दिले आहेत. याचा अर्थ त्या ही पोकळी असल्याचे पहात आहेत. ममतांनी स्वतः तसे तोंडाने बोलून दाखवले नसले तरीही विविध विचारांच्या विरोधी पक्षांना आपण एकत्र आणण्याची क्षमता आपल्यात आहे, असा त्यांना ठाम विश्वास वाटत आहे, हेच त्यांच्या दिल्लीवारीवरून सिद्ध होते. यावरून त्या स्वतःकडे संभाव्य पंतप्रधानपदाचा पर्याय म्हणून पहातात, हेही स्पष्ट होते. त्यांची  ही समजूत कितपत खरी किंवा खोटी आहे, हे काळच ठरवणार आहे. पण ममतांनी स्वतःला जरी प्रत्यक्ष घोषित केले नसले तरीही दोन हजार चोविसच्या निवडणुकीत त्या स्वतः मोदींना पर्याय म्हणून असलेल्या शर्यतीत उतरतील, याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर बाकीच्या पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा बाळगणार्या नेत्यांचे काय होणार, हा प्रश्न रहातोच. राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. परंतु त्याचे अध्यक्ष शरद पवार यांना मोदींना पर्याय म्हणून पाहिले जाते. अर्थात हे फक्त महाराष्ट्रातच होत आहे. बाकीच्या राज्यांना पवारांचे एवढे महत्व नाहि आणि पवारांची विश्वासार्हताही नाहि. पवारांची पात्रता पंतप्रधानपदाची निश्चितच आहे. परंतु त्यांच्याकडे विश्वासार्हतेचा अभाव आहे. शिवाय पवारांचे वय त्यांच्या या स्पर्धेच्या आड येणार आहे. कारण आजच ते ऐशी वर्षाचे आहेत आणि निवडणुका होतील तेव्हा त्यांचे वय आणखी तीन वर्षानी वाढलेले असेल. तेव्हा त्याना निवडणूक आणि प्रचाराची दगदग झेपण्याची शक्यता खूप कमी आहे. केवळ वयामुळेही ते या स्पर्धेतून बाद होऊ शकतात. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की भाजपचे दिग्गज मोदी आणि शहा यांच्याविरोधात एकच भक्कम आघाडी करण्याच्या पवारांच्या क्षमतेवर मर्यादा आहेत. मध्यंतरी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाल्या तेव्हा पवारांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यांनी स्वतःच काँग्रेसचा सहभाग असल्याशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाहि, असे सांगितले होते. पवारांच्या नेतृत्वाखालील आघाडीत काँग्रेस कधीही देशपातळीवर दाखल होणार नाहि. पवारांना राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आघाडी करण्यातही अपयश आले होते. पवारांचे कार्यकर्ते आपल्या साहेबांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत घेतले जाते म्हणून कितीही खुष होत असले तरीही पवारांच्याबाबतीत सार्याच मर्यादा आहेत. राहुल यांच्याबाबतीत पक्षातच विश्वास नाहि. त्यातून त्यांचे अर्धे वर्ष सुट्टीत जाते. त्यामुळे पवार आणि राहुल हे आपोआपच या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे. नितीशकुमार हा एक चांगला पर्याय होता. परंतु ते स्वतःच मोदींच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे आता मोदी यांना टक्कर देऊ शकणारा सक्षम नेता म्हणून ममतांचे नावच घ्यावे लागते. निवडणुकीला अद्याप तीन वर्षे अवकाश आहे. त्या दरम्यान आणखी एखादे अचानक नाव पुढे आले तर सांगता येत नाहि. परंतु सध्या तरी ममता याच मोदींना पर्याय होऊ शकतात. याची जाणिव ममतांना आहे. त्यांना आता देशपातळीवर मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने आणायचे आहे. त्यांच्या या धोरणामुळे त्यानी एकाच वेळेला भाजपलाही पराभूत केले आणि काँग्रेसलाही संपवले. मुस्लिम मतदार त्यान काँग्रेसकडे जाऊ दिला नाहि. त्यात बंगालमध्ये काँग्रेस ४४ वरून शून्यावर आली. हेच काम त्यांना आता देशात करायचे आहे. त्या एकाच वेळेला दोन पक्षांना टक्कर देत  आहेत. देश पातळीवर त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर ममता या मोदींना पर्याय म्हणून पुढे येऊ शकतील. शेवटी सारे काही मतदार ठरवणार आहेत. पण आज तरी ममतांशिवाय विरोधी आघाडीकडे उत्तम नेता नाहि, हे मान्यच करावे लागेल.