कोरोना : जपानमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत आणीबाणी, टोक्यो ऑलिम्पिकवरही सावट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो : कोरोना विषाणूचा धोका देशातच नव्हे तर जगभरात कायम आहे. त्यात जपान सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ३१ ऑगस्टपर्यंत आणीबाणी जाहीर केली आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे टोक्यो ऑलिम्पिकवरही याचे सावट निर्माण झाले आहे.
टोक्यो शहर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलैला ३,८६५ नवे रुग्ण आढळले, तर संपूर्ण देशात १०,६९९ कोरोना रुग्ण सापडले होते. महामारी सुरू झाल्यानंतर हे दोन्ही आकडे सर्वाधिक आहेत. सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत आहे, पण संक्रमण कमी व्हायची गती कमी होत नाही. सध्या ही आणीबाणी टोक्यो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावामध्ये लागू करण्यात आली आहे. या राज्यांशिवाय होक्काइडो, इशिकावा, क्योटो, ह्योगो आणि फुकुओका या प्रांतांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान टोक्योत ऑलिम्पिकची स्पर्धा सुरू आहे. जगभरातील विविध देशांचे हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी येथे उपस्थित आहेत. टोक्यो आणि ओकिनावामध्ये लावण्यात आलेले निर्बंध ऑलिम्पिक आणि ओबोन हॉलीडे लक्षात घेऊन लावण्यात आले आहेत. टोक्योमध्ये ऑलिम्पिकनंतर पॅरालिंपिकचे आयोजन करण्यात येणार आहे. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.