मुंबईला हरवल्यानंतर KKRच्या कप्तानाला बसला जबर फटका!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने (केकेआर) दणदणीत सुरुवात केली आहे. पहिले त्यांनी विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवले आणि आता त्यांनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचाही ७ गडी राखून सहज पराभव केला. यासह, केकेआरने गुणतालिकेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे. एकीकडे केकेआरने सामना जिंकला, तर दुसरीकडे त्याचा कर्णधार ईऑन मॉर्गन अडचणीत सापडला आहे.
ईऑन मॉर्गनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह, टीमच्या उर्वरित सदस्यांना ६ लाख रुपये दंड किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे. आयपीएलने म्हटले, “कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ईऑन मॉर्गनला अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित नियमांनुसार, संघ दुसऱ्यांदा निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आणि म्हणून मॉर्गनला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.”
सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (नाबाद ७४) यांनी कोलकाता नाईट रायडर्सला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात केकेआरचा हा सलग दुसरा विजय आहे, तर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव होता.
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने १५.१ षटकांत तीन गडी बाद १५९ धावा करून सामना जिंकला. आयपीएलचा दुसरा सामना खेळताना अय्यरने ३० चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. दुसरीकडे, राहुल त्रिपाठी ४२ चेंडूत ७४ धावांवर नाबाद राहिला.