मनूचा दुहेरी सुवर्णवेध!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लिमा : ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्णकमाईमुळे भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांवर नाव कोरले.
भारताला १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अशा तिन्ही गटांत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. भारताची १९ वर्षीय नेमबाज मनूने या स्पर्धेत अचूक वेध साधताना तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत. सरबजोत सिंगसोबत मिश्र सांघिक गटात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर मनूने १० मीटर एअर पिस्तूलच्या महिला सांघिक गटात रिदम सांगवान आणि शिखा नरवालसह खेळतानाही सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत बेलारूसला १६-१२ असे पराभूत केले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही भारताने वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान मिळवले होते. भारताच्या पुरुष एअर पिस्तूल संघाने बेलारूसवर १६-१४ अशी सरशी साधली. भारताच्या या संघात नवीन, सरबजोत आणि शिवा नरवाल यांचा समावेश होता. त्याआधी, १० मीटर रायफल प्रकारातही भारताच्या पुरुष संघाने सोनेरी कामगिरी केली होती. महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये निशा कन्वर, झीना खिट्टा आणि आत्मिका गुप्ता यांचा भारतीय संघ पात्रतेच्या पहिल्या फेरीच्या अखेरीस अव्वल स्थानी होता. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यांना हंगेरीने मागे टाकले. हंगेरीने खेळात सातत्य राखताना अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच आत्मिका आणि राजप्रीत सिंग यांनी मिश्र सांघिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.