मोठय़ा कंपन्यांच्या मधात साखर!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अनेक मोठय़ा कंपन्यांकडून कमी दर्जाच्या मधाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईतून उजेडात आली आहे.
‘एफडीए’ने नुकतीच एक विशेष मोहीम राबवत राज्यभरातून घेतलेल्या मधाच्या ८६ नमुन्यांपैकी ५२ नमुने कमी दर्जाचे असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. यात पतंजली, डाबर, झंडू, बैद्यनाथ, सफोला, उत्तराखंड हनीसह अनेक बडय़ा कंपन्यांच्या मधाचा समावेश आहे.
या कंपन्यांच्या मधात साखरेचे प्रमाण आढळली असून आता या कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे ‘एफडीए’ने सांगितले.
काही महिन्यांपूर्वी ‘एफडीए’ने मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्याकडील मधाची पाहणी करत तपासणीसाठी ८६ नमुने ताब्यात घेतले होते. तर तीन ठिकाणच्या मधाबाबत साशंकता वाटल्याने ३४८०.२५ किलो मध जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या मधाची किंमत ३६ लाख १९ हजार ३१९ रुपये इतकी होती.
८६ नमुन्यांचा तपासणी अहवाल एफडीएला प्राप्त झाला असून यातील ५२ नमुने कमी दर्जाचे असल्याने स्पष्ट झाल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
कमी दर्जाच्या भेसळयुक्त मधाची विक्री बाजारात राजरोसपणे होत असून यात मोठय़ा कंपन्यांच्या मधाचाही समावेश आहे. पतंजली, डाबर, सफोला, झंडू, बैद्यनाथ, उत्तराखंड हनी, डीलीव, अंडर द मँगो ट्री, रसना, हिमालया, रिलायन्स हेल्दी लाईफ, मधूपुष्प, मधूबन अशा अनेक कंपन्यांचे मध कमी दर्जाचे आणि भेसळयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
अनेक नमुन्यात साखरेची भेसळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. काही नमुन्यांमध्ये नैसर्गिक घटकांऐवजी कृत्रिम घटक आढळून आले आहेत.
भेसळयुक्त मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी अपायकारक आणि घातक ठरू शकते. त्यातही मधुमेहींवर याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधात भेसळ करणाऱ्या कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएचे बृहन्मुंबईचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली.