मुंबईत बोगस लसीकरण करणार्‍या १० आरोपींना अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत बोगस लसीकरण करणार्‍या १० आरोपींना अटक

मुंबई  : मुंबईत विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहेया प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत सात गुन्हे दाखल असून एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अधिक तपासासाठी एसआयटी देखील नेमण्यात आली आहे.

 

आत्तापर्यंत मुंबईत विविध ठिकाणी झालेले बोगस लसीकरणआदित्य कॉलेज बोरिवली येथे २२५ जणांचे, मानसी शेयर्स अंड स्टॉक शिंपोली बोरिवली येथे ५१४, पोद्दार एज्युकेशन सेंटर परळ येथे २०७, टिप्स कंपनी अंधेरी येथे १५१, टिप्स कंपनी खार येथे २०६, बँक ऑफ बरोडा लिंक रोड मालाड येथे ४० अशा प्रकारे एकूण १३४३ लोकांचे बोगस लसीकरण या टोळीने केले आहे. अटक करण्यात आरोपींमध्ये महेंद्र प्रताप सिंह (वय ३९), संजय गुप्ता (वय २९), चंदन सिंह (वय ३२), नितीन मोंडे (वय ३२), मोहंमद करीम अकबर अली (वय १९), गुडिया यादव (वय २४), शिवराज पटारिया (वय ६१), नीता शिवराज पटारिया (वय ६०), श्रीकांत माने (वय ३९) आणि सीमा अहुजा (वय ४२) यांचा समावेश आहे.

 

असे केले जात होते बोगस लसीकरण

 

एखाद्या कंपनीला किंवा सोसायटीला लसीकरण करून घ्यायचा आहे का याची माहिती गोळा करायचे. त्यानुसार कॅम्प आयोजित करून या टोळीकडून लसीकरण केले जायचे. लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरवठा हा कांदिवलीतील शिवम हॉस्पिटल, चारकोप येथून केला जात होता. याचे मालक शिवराज पटारीया आणि पत्नी नीता पटारीया आहेत. या सगळ्याचे नियोजन मुख्य आरोपी महेंद्र सिंहने केले होतेएकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात होते.

 

आरोपींकडून १२ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त

 

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत. तर या आरोपींकडून १२ लाखांपेक्षा अधिक रकमेसह ११४ बनावट प्रमाणपत्रेही जप्त करण्यात आले आहेत. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही तसंच प्राथमिक तपासात यांनी दिलेल्या लसीमध्ये काय हानिकारक द्रव्य होते का हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा पोलिसांनी आवाहन केले जात आहे की जर त्यांच्या निदर्शनास असा एखादा बनावट कॅम्प आला किंवा त्यांना संशय असला तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

 

हिंदुस्थान समाचार