माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महापालिकेला आठवा क्रमांक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चंद्रपूर : शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये अभियान राबविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपक्रम पूर्ण केले. यात अमृत गटातून चंद्रपूर मनपाला आठवा क्रमांक प्राप्त झाला. “माझी वसुंधरा अभियानांतर्गत” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रिय पर्यावरण दिनी ५ जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडला. “माझी वसुंधरा अभियानांतर्गत” भूमी, जल, वायू, अग्नी, व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेने महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील हरित आच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने दहा हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले. शहरामध्ये मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करून उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या व जुन्या असलेल्या हरित क्षेत्रांचे संगोपन देखील करण्यात येत आहे. शहरातील धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वृक्षलागवड करून विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरात विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गो ग्रीन चंद्रपूर अंतर्गत जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिका स्वतः सौर ऊर्जेचा वापर करीत आहे. अपारंपरिक ऊर्जेचा तसेच विद्युत वाहनांच्या जनजागृती आणि प्रोत्साहनाकरिता महानगरपालिका व विविध सर्विस प्रोव्हायडर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रसार रोखण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्युत वाहनांची टेस्ट ड्राईव्ह व सौर ऊर्जा उपकरणांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. वायु गुणवत्ता तपासणी करीता चंद्रपूर शहरामध्ये Ambient Air Quality monitoring stations उपलब्ध असून 24 तासात तीन वेळा वायू गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. एक पाऊल प्रदुषणमुक्त चंद्रपूर शहराकडे या संकल्पनेला चालना देऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.