श्रीलंका दौऱ्यात ऋतुराज गायकवाड वापरणार धोनीने दिलेला 'हा' गुरुमंत्र
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेक खेळाडूंना आपल्या खेळत सुधारण्यास आणि पुढे जाण्यास मदत करतो. या खेळाडूंच्या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे. ऋतुराजने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, महेंद्रसिंग धोनीने त्याला खूप मदत केली आणि त्यामुळे त्याच्या कामगिरीमध्ये सातत्यता आली.
ऋतुराज गायकवाडने 2020 च्या इंडियन प्रीमियर लीग हंगामातून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पदार्पण केले होते. परंतु, त्या हंगामात ऋतुराजला जास्त संधी मिळाल्या नव्हत्या. तसेच तो हंगाम सुरु होण्यापूर्वी ऋतुराजला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून सावरुन पुनरागमन करताना ऋतुराजला काहीसा संघर्ष करावा लागला होता. मात्र, त्याने या हंगामातील चेन्नईच्या अखेरच्या तीन सामन्यांत अर्धशतके ठोकत आपली क्षमता दाखवून दिली होती.
नुकतीच ऋतुराजने श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात निवड झाली आहे. त्यामुळे आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी आहे.
आनंद बाजार पत्रिकासोबत बोलताना ऋतुराजने सांगितले की, 'माही भाईने एक कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये मला सलामीवीर फलंदाज म्हणून पूर्णपणे पाठिंबा दिला.'
ऋतुराज पुढे म्हणाला की, 'माही भाईने नेहमी माझी मदत केली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला मला धावा बनवता आल्या नव्हत्या. परंतु मी माझा आत्मविश्वास गमावला नाही आणि सतत सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानावर उतरत होतो. माही भाईने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळे मला खूप मदत झाली.'
ऋतुराज गायकवाडने तो गुरुमंत्र देखील सांगितला जो महेंद्रसिंग धोनीने त्याला दिला होता. धोनीने ऋतुराजला सांगितले होते की, एक यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. ऋतुराजने सांगितले की धोनीने त्याला सांगितले होते की नेहमी चेंडूच्या गुणवत्तेवर लक्ष द्यायचे. मैदानावर विरुद्ध संघाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही.
ऋतुराज पुढे म्हणाला की, 'माही भाई नेहमी शांततेत खेळत असतात. चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळून तुम्हाला यश मिळते. विरोधी संघ तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करेल, आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. माही भाईनी मला या जाळ्यात न पडण्याचा सल्ला दिला. त्याचा सल्ला मला उपयोगी पडेल.'