अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : बार्टीची वाटचाल खंडित
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये रविवारीसुद्धा मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका कायम राहिली. महिलांमध्ये अग्रमानांकित अॅश्ले बार्टीला रविवारी गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोव्हिचने मात्र विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करताना उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील लढतीत अमेरिकेच्या बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने ऑस्ट्रेलियाच्या बार्टीवर ६-२, १-६, ७-६ (७-५) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. शनिवारी गतविजेत्या नाओमी ओसाकाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
अन्य लढतींमध्ये चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अज्ला टॉमलिजानोव्हिचला ६-३, ६-२ अशी धूळ चारली. पोलंडच्या सातव्या मानांकित इगा श्वीऑनटेकने अॅनेट कोंटावेटवर ६-३, ४-६, ६-३ अशी सरशी साधली. याव्यतिरिक्त, २०१९ची विजेती बियांका आंद्रेस्कू, १७वी मानांकित मारिया सकारी यांनीसुद्धा पुढील फेरीत प्रवेश केला.