रुग्णसंख्येत अंधेरी आघाडीवर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईमधील पश्चिम उपनगरांमधील अंधेरी परिसर रुग्णसंख्येच्या यादीत आघाडीवर असून या परिसरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 91 हजार 262 वर पोहोचली आहे, तर एक हजार 764 रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. या परिसरातील रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.
मुंबईमधील दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावी, वरळी कोळीवाडा, गणपत पाटील नगर यांसह विविध ठिकाणच्या झोपडपट्टय़ांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांना आजही वाटत आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये झोपडपट्टय़ांऐवजी बहुमजली इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे बहुमजली इमारतींमधील नियम न पाळणारे रहिवासी पालिकेसाठी डोकेदुखी बनू लागले आहेत.
शहरातील धारावी, वरळी, भायखळा, ग्रॅन्ट रोड, पश्चिम उपनगरांमधील बोरिवली, कांदिवली, मालाड, तर पूर्व उपनगरांमधील गोवंडी मानखुर्द, मुलुंड भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे या भागांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवून सापडलेल्या बाधितांना विलगीकरणात ठेवण्यावर भर देण्यात येत होता. आता अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या सहा लाख 82 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी 91 हजार २६२ रुग्ण अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरातील आहे. अंधेरी पूर्व भागात 42 हजार २७८, तर पश्चिम परिसरात ४८ हजार 984 रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत अंधेरीतील 81 हजार ७२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यातील ३७ हजार ५१० पूर्वेचे, तर ४४ हजार २१३ पश्चिमेच्या रहिवाशांचा समावेश आहे.