निवृत्तीवेतन वितरण त्वरेने करण्याच्या बँकांना सूचना – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुलभ होण्याच्या दृष्टीने महत्वाची सुधारणा करत, निवृत्तीवेतन त्वरेने वितरीत करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा जोडीदार किंवा कुटुंबातल्या सदस्यांची, अनावश्यक तपशील आणि कागदपत्रे यासाठी गैरसोय होऊ नये आणि निवृत्तीवेतन लवकरात लवकर वितरीत करण्यात यावी अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाबाबत डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली.
निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर, त्या व्यक्तीचे निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या बँकेने, त्यांच्या कुटुंबियांना, कौटुंबिक निवृत्तीवेतना साठी आवश्यक नसणारा तपशील आणि कागदपत्रे सादर करायला सांगितल्याची काही प्रकरणे विभागाच्या निदर्शनाला आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, निवृत्तीवेतन धारकासह सर्वांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय, विशेषतः कोरोना महामारीच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी लक्ष पुरवण्यात येत आहे.
निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या सर्व बँकांच्या प्रमुखांना पत्र पाठवण्यात आले असून मृत निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबियांना कोणताही त्रास न देता, मृत्यूचा दाखला सादर केल्यानंतर कुटुंबियांना निवृत्तीवेतन जारी करावे तसेच निवृत्तीवेतनधारकाचे त्याच्या जोडीदारासमवेत संयुक्त खाते असल्यास केवळ पत्र किंवा अर्ज, कौटुंबिक निवृत्तीवेतन सुरु करण्यासाठी पुरेसा असल्याचे यात म्हटले आहे.मृत निवृत्तीवेतनधारकाचे त्याच्या जोडीदारासमवेत संयुक्त खाते नसल्यास दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यासह फॉर्म-14, कौटुंबिक निवृत्तीवेतन सुरु करण्यासाठी वैध मानला जाईल.
हिंदुस्थान समाचार