तोक्ते चक्रीवादळा संदर्भात तयारीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई: अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.
आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.
चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले.मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
याप्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील विस्तृत माहिती दिली ती खालीलप्रमाणे
सागरी किनाऱ्याजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( २३० मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स ( १२० मेट्रिक टन), लिंडे तळोजा ( २४५ मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (१२० मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड ( १२० मेट्रिक टन), असे साधारणत: ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सुचना देण्यात आल्या आहेत.