“ते ईडीला येडा समजले बहुधा”, नाशिकमध्ये राज ठाकरेंची टोलेबाजी!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राज्यात सत्ताधारी आण विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि वाकयुद्धाविषयी देखील त्यांनी टोलेबाजी केली. राज्यात सध्या कुठल्या गोष्टीची भितीच उरलेली नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, “काय चालू आहे मला काही कळतच नाहीये. किती वैयक्तिक पातळीवर जायचं आणि काय बोलायचं. साप काय, बेडूक काय.. सगळा झू करून टाकलाय”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी, आयकर विभाग आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं वारंवार नोटिसा बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ईडीनं अनिल देशमुखांविरोधात लुकआऊट नोटीस देखील काढली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख नेमके चौकशीसाठी कधी हजर राहणार, अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.