अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई दि. ४ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून राज्य सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुनगंटीवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. आघाडी सरकारने केवढी मोठी मदत दिली, असा गाजावाजा महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. प्रत्यक्षात या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. ७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत म्हणजे स्वप्नांचे इमले रचण्याचाच प्रकार आहे. याचा अर्थ पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली आहे. या १५०० कोटींच्या मदतीतून पुराचा व अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या हाती फारसे काहीच लागणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता त्यातही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते आहे. आमच्या सरकारने पूर, अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती अशांना ९५ हजार १०० रूपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते. तसेच पंतप्रधान आवास, शबरी, रमाई, आदीम अशा योजनांखाली घरे बांधूनही देण्यात आली. आघाडी सरकारने संकटग्रस्तांना घरभाडे दिलेले नाही तसेच ज्यांची घरे पूर्णतः बाधीत झाली आहेत अशांनाही योग्य मदत दिली नाही. शेतकऱ्यांना आमच्या सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा कमी मदत आघाडी सरकारने दिली आहे.आमच्या सरकारने ५ ब्रास मुरूम व ५ ब्रास वाळूही मोफत दिली होती. आघाडी सरकारने या पद्धतीने पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांची थट्टा करू नये, असेही मुनगंटीवार यांनी पत्रकात म्हटले आहे.