शिवसेनेत आता फक्त झाडांवर उड्या मारणारे राहिलेत – नारायण राणे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. आज सकाळी नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. आधी मुंबई विमानतळ, नंतर बाळासाहेब स्मारक आणि दुपारी परळ या भागात नारायण राणेंनी स्थानिक जनतेशी संवाद साधला. या प्रत्येक वेळी नारायण राणेंनी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि शिवसेना या मुद्द्यांना हात घालत टीकास्त्र सोडलं आहे. परळमध्ये बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोचक टीका करतानाच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये सत्तापालटाचा आत्मविश्वास व्यक्त केला.
मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले, पण…
“मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, मग मराठी माणसाच्या जीवनात हे परिवर्तन का करू शकले नाहीत? मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले, पण मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल नाही. आजही अनेक शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. ही पाळी का आणावी?”, असा सवाल नारायण राणे यांनी परळमध्ये बोलताना विचारला आहे.
“कसले मुख्यमंत्री? हे पिंजऱ्यात राहतात”
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. “या राज्याचे मुख्यमंत्री कुणी आहेत असं मला वाटतच नाही. काही दम नाही. कसले मुख्यमंत्री, पिंजऱ्यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं”, असं ते म्हणाले.
“३२ वर्षांत बकाल करून टाकली मुंबई. किती माणसं मुंबईत करोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा”, असं राणेंनी यावेळी नमूद केलं.