‘ती असे काम करु शकत नाही’, हंगामा २च्या निर्मात्याने घेतली शिल्पाची बाजू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
काही दिवसांपूर्वी ‘हंगामा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेते परेश रावल हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती रतन जैन यांनी केली आहे. दरम्यान शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणात अटक झाली. राजच्या अटकेनंतर शिल्पाच्या ‘हंगामा २’ चित्रपटावर या सर्व गोष्टींचा परिणाम होईल का? असा प्रश्न चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी रतन यांनी शिल्पाला पाठिंबा देत ‘ती असे काम करु शकत नाही’ असे म्हटले आहे.
नुकतीच रतन यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना शिल्पाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले की मी जितकं शिल्पाला ओळखतो त्यावरुन ती अशा प्रकरणात सामील असेल असे मला वाटत नाही. मी असेही म्हणू शकत नाही की शिल्पाला तिच्या पतिच्या बिझनेसविषयी माहिती नव्हते. पण ती असे काम करु शकत नाही. मला नाही वाटत या प्रकरणामध्ये शिल्पा सहभागी असेल. मी शिल्पाला ओळखतो त्यामुळे ती असे काम करणार नाही.
‘हंगामा २’ चित्रपटापूर्वी शिल्पाने रतन यांच्यासोबत ‘धडकन’ आणि ‘हथियार’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. त्यांच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ‘हंगामा २’च्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आले.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रांचा सात दिवसांचा पोलीस रिमांड मागितला होता. मात्र, कोर्टाने तिसऱ्यांदा रिमांड मंजूर करण्यास नकार दिला. दरम्यान, सेबीने (SEBI) शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे. ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्याच आल्याचे सांगण्यात आले आहे.