भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण – संजय राऊत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. यावेळी ठाणे शहरात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात्रेमध्ये करोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली. यावर शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राज्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी भाजपाला संयम बाळगण्यास सांगितले आहे. “जन आशीर्वाद यात्रा ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही शक्तीप्रदर्शन करताय हे एक प्रकारे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करताय. ठीक आहे पण किमान तुम्ही संयम पाळा,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. “कृपया संजय राऊत यांना सांगा की हे माझ्या लक्षात आले आहे पण आम्ही सरकारची धोरणे लोकांपर्यंत नेणे थांबवू शकत नाही. मी हे म्हणू नये, पण जेव्हा ते मास्क न घालता, एकमेकांच्या जवळ उभे असतात आणि सभागृहात असतात तेव्हाची दृश्ये पहा,” असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.