तृणमूलचे शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : राज्यसभेत माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हातून निवेदन फाडून उपसभापतींवर भिरकावणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांना निलंबित करण्यात आलेय. त्यामुळे खासदार सेन यांना उर्वरित अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदन खेचून घेत फाडले होते. यानंतर भाजपाने शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांना निलंबित केलेय.
पेगॅसस’ गुप्तहेर तंत्रज्ञानाच्या कथित हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाचे कागद हिसकावून घेऊन ते उपसभापतींच्या आसनाकडे भिरकावण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे ‘पेगॅसस’ प्रकरणावर मंगळवारी राज्यसभेत स्पष्टीकरण देणार होते, पण करोनावरील चर्चेमुळे ते गुरुवारी दोन वाजता केंद्र सरकारची भूमिका मांडणार असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली होती. सभागृहाचे कामकाज सुरू होताच ‘पेगॅसस’ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृह लगेचच तहकूब केले, त्यानंतर दुपारी 12 वाजता दुसऱ्यांदा कामकाज तहकूब झाले. दुपारच्या सत्रात सभागृह सुरू झाल्यानंतर वैष्णव यांनी लेखी निवेदनातील मजकूर वाचताच तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून घेतले आणि उपसभापती हरिवंश यांच्या दिशेने भिरकावले. गोंधळ वाढत गेल्याने वैष्णव यांनी निवेदन वाचन न करता ते सभागृहाच्या पटलावर मांडले. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने कागदांची फाडाफाडी केल्यामुळे विरोधकांप्रमाणे भाजपाचे सदस्यही आक्रमक झाले. तृणमूलचे सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. अखेर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी सभागृहातील मार्शलना मध्यस्थी करावी लागली. पुरी यांनी मला धमकी दिली, त्यांनी मला शारीरिक मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांनी मला वाचवले, असा दावा सेन यांनी संसद भवनाबाहेर केला.