चौथ्या दिवसाची मदार पुजारा-कोहलीच्या खांद्यावर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडची धडपड सुरु आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमकपणा दाखवत इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ७८ धावांवर रोखलं. या खेळीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली होती. त्यानंतर इंग्लंड ४३२ धावांचा डोंगर रचला. त्यामुळे आता सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाज कशी फलंदाजी करतात याकडे लक्ष लागून होतं. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. केएल राहुल ८ धावा करून बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा ५९ धावा करून बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ९१ आणि कोहली ४५ धावांवर नाबाद खेळत आहेत.
दुसऱ्या डावात भारत अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर असून पुजारा-कोहली खेळपट्टीवर तग धरून आहेत. या दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९९ धावांची भागीदारी रचून भारताला आशादायी किरण दाखवले आहेत. भारताने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. के. एल. राहुल आणि रोहित या सलामीच्या जोडीने १८ षटके खेळून काढली. परंतु उपहारापूर्वी अखेरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने एकहाती झेल पकडून राहुलला (८) बाद केले. दुसऱ्या सत्रापासून मग रोहित-पुजारा यांनी सूत्रे सांभाळली. दोघांना अतिबचावात्मक खेळ न करता जमिनीलगतच्या फटक्यांच्या बळावर दुसऱ्या सत्रात ७८ धावा लुटल्या. रोहितने मालिकेतील दुसरे अर्धशतक साकारून चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले, तर पुजाराने नेहमीच्या शैलीविरुद्ध यंदा रोहितपेक्षा सरस धावगतीने धावा काढल्या.