ओव्हलवर भारताचा ऐतिहासिक विजय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानात सोमवारी भारतीय क्रिकेट संघाने कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. एका कसोटीत, तीही निर्णायक नव्हे, कारण अजून एक कसोटी सामना बाकी असताना, या कसोटी विजयाचे महत्व इतके काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या विजयाचे महत्व भारताने पुढील कसोटीही जिंकून मालिका जिंकली तरीही त्यापेक्षा जास्त आहे. केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारताला यापूर्वी फक्त १९७१ मध्ये विजय मिळाला होता. तो भारतीय संघ अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली गेला होता आणि त्यातूनच सुनील गावसकरसारखा हिरा भारतीय संघाला गवसला होता. मात्र ओव्हलवरचा तो ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सुनीलबरोबर चंद्रशेखर या फिरकी गोलंदाजाचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर आजचा भारताचा विजय हा सांघिक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. कोणताही विजय हा सांघिक असला तरीही त्यातही काही खेळाडू असे असतात की त्यांच्या भव्यदिव्य कामगिरीनेच असे दुर्मिळ विजय साकार होतात. यावेळी भारताकडून शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा या चौघा खेळाडूंनी ही भव्य कामगिरी केली आहे. शार्दुलने दोन्ही डावांत झळकवलेली अर्धशतके आणि घेतलेल्या तीन विकेट्स, बुमरा आणि जाडेजाने मोक्याच्या क्षणी इंग्लिश फलंदाजांचे घेतलेले बळी आणि रोहितचे शानदार शतक या जोरावर हे साध्य होऊ शकले. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी केवळ २९१ धावा इंग्लंडला हव्या होत्या आणि त्याची सलामीची जोडी बिनबाद ७७ वर नाबाद होती. तरीही दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळवला. आधीच्या कसोटीत जिंकल्यानंतर आत्मविश्वास मिळवलेला भारतीय संघ नेहमीप्रमाणे पेटून उठला आणि तसाच खेळला. याच्या अगोदरच्या मालिकेतही भारतीय संघ ३६ वर सर्वबाद अशा लाजिरवाण्या अवस्थेतून बाहेर येऊन मालिका जिंकला होता. इंग्लिश माजी कर्णधार नासिर हुसेन याने याची इंग्लिश खेळाडूंना आठवणही करून दिली होती. परंतु इंग्लिश खेळाडुंना अप्रतिम कामगिरीबरोबरच अति आत्मविश्वासाने भारून जाण्याचाही शाप आहे. तरीही भारताने या मैदानावर विजयी होण्याला यासाठीही महत्व आहे कारण या मैदानावर इतिहास भारताला प्रतिकूल आहे. केवळ एकच विजय भारताला नोंदवता आला आहे आणि तोही १९७१ मध्ये. या सामन्याआधी संघात अश्विनला घेण्याबाबत कप्तान विराटवर प्रचंड दबाव होता. तरीही त्याने अश्विनला खेळवण्याऐवजी उमेश यादवला खेळवले आणि त्याने आपली निवड सार्थही ठरवली. पण याचा अर्थ अश्विन अपयशी ठरला असता, असा नव्हे. तोही फलंदाजी करू शकतो आणि अप्रतिम गोलंदाजी करून बळीही घेऊ शकतो. पण इंग्लंडने पहिल्या डावात एकही षटक फिरकी गोलंदाजाला दिले नव्हते. यावरून भारताचाही केवळ जडेजा या फिरकीपटुला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. संघाची निवड ही अखेरीस मैदानातील प्रत्यक्ष स्थितीवरून ठरते. पूर्वलौकिकावरून नव्हे, हे टिकाकारांनीही लक्षात घ्यायला हवे. अखेरच्या दिवशी दिलेले ३६८ धावा करण्याचे आव्हान कोणत्याही संघासाठी प्रचंड आहे. ते आव्हान पार करण्यात इंग्लंड संघाला अपयश आले, याची काहीही कारणे असली तरीही ते कोणत्याही संघाला शक्यच नव्हते. कारण शेवटच्या दिवशी २९१ धावा करणे हे जवळपास अशक्य आहे. केवळ भारताने शेवटच्या दिवशी ४०० हून जास्त करण्याचे आव्हान दोन वेळाच पार केले आहे. पण तसा पराक्रम अद्याप कोणत्याही संघाने एकदाही केलेला नाहि. इंग्लिश संघाच्या पराभवाचे जेव्हा पोस्टमॉर्टम होईल तेव्हा त्यांना हे करण्याचे आव्हान दिले, यातच त्याचे उत्तर सापडेल. इंग्लिश संघाला मोईन अलीसारख्या अप्रतिम फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवण्याची चूक मात्र महागात पडली. जे भारताला अश्विनच्या बाबतीत नुकसान झाले नाहि, ते इंग्लंडला मोईनच्या बाबतीत जरूर झाले. ख्रिस वोक्सने प्रभाव दाखवला. पण तो पुरेसा नव्हता. मोईन नसल्याचा पश्चात्ताप ज्यो रूट कायम करत राहिल. या कसोटीतून आणखी एक सार्वत्रिक गोष्ट सिद्ध झाली आहे. आता पारंपरिक शेपूट हे शेपूट रहात नाहि. कारण आता गोलंदाजही चांगले फलंदाज असतात. शार्दुल ठाकूर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शार्दूलने विकेट घेतानाच फलंदाजीत दोन्ही डावात अर्धशतके झळकावून आपली उपयुक्तता कितीतरी अधिक प्रमाणात सिद्ध केली आहे. तो पुढचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्याला अगदी भावी कपिलदेव म्हणणे फारच घाईचे ठरेल, पण तो दर्जेदार अष्टपैलू म्हणून पुढे येऊ शकतो. भारतासाठी काही कमजोर कडीही सिद्ध झाल्या आहेत. त्यातील प्रमुख आहे ती उपकर्णधार अजिंक्य रहाणे. अत्यंत उत्तम आणि दर्जेदार फटके मारण्याची क्षमता असलेला हा फलंदाज सध्या भलताच चाचपडत आहे. या कसोटीत त्याला खेळवू नका, असा सार्यांचा दबाव होता. तरीही कोहलीने त्याच्यावर विश्वास टाकला. पण तो त्याला पात्र ठरू शकला नाहि. पहिल्या डावात त्याने फक्त १४ धावा केल्या आणि दुसर्या डावात तर त्याला भोपळाही फोडता आला नाहि. त्याला आता खरोखरच विश्रांती देण्याची गरज आहे. केवळ कोहलीच्या हट्टापायी त्याला खेळवणे हे भारताला महाग पडणार आहे. ही कसोटी भारताने गमावली असती तर पहिली कुर्हाड रहाणेवरच पडली असती. त्याच्या जागेवर लवकरात लवकर रोहित शर्माची निवड होणे आवश्यक आहे. चेतेश्वर पुजाराने अखेरची संधी मिळाल्याप्रमाणे मागच्या कसोटीत ९१ धावा केल्या आणि याही कसोटीत चांगल्या धावा करून आपले स्थान राखले. त्याने आता गतिमान खेळणे मनावर घेतले आहे, हे चांगले आहे. भारताला आता रहाणेच्या जागी नवा फलंदाज घेण्याची संधी आहे आणि आवश्यकताही आहे. राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देऊन आणखी एक फलंदाज किंवा गोलंदाजही घेता येईल. काहीही असो, भारताने ओव्हलवर इंग्लंडला पाणी पाजून एक चमत्कार केला आहे. पूर्वेतिहास नेहमीच कामाला येतो, असे नाहि, हे आता इंग्लंडच्या लक्षात आले असेल.