OBC Reservation साठी भाजपचं आंदोलन, ठिकठिकाणी जेलभरो आणि चक्काजाम!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मुंबईत आशिष शेलार, खासदार मनोज कोटक तर पुण्यात पंकजा मुंडे, नागपुरात देवेंद्र फडणवीस आंदोलनात सहभागी झाले.
मुलुंड इथल्या आनंदनगर टोलनाक्यावर भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पुण्यात माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. पिंपरीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन झालं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आंदोलन रद्द झाली, अशी टीका त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
गोंदियात शेकडो बैलगाड्या घेऊन भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर
गोंदियात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने सडक अर्जुनीतून भव्य बैलगाडी मोर्चा काढून कोहमारा इथल्या मुंबई-हावडा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग 6 वर हजारो भाजप कार्यकर्त्यानी महामार्ग रोखून धरला. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो बैलगाड्या ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज्य सरकार ओबीसींचे आरक्षण हिरावण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आंदोलक नेत्यांनी केले.
चंद्रपुरात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे चक्काजाम आंदोलन
चंद्रपुरात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आज ठिकठिकाणी चक्काजाम केले. चंद्रपूर-नागपूर आणि चंद्रपूर-यवतमाळ मार्गावर पडोली चौकात हजारो भाजप कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पडोली चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर हंसराज अहिर यांनी वरोरा येथे तर चिमूर येथे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी चक्काजाम केला. ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज्य सरकार ओबीसींचे आरक्षण हिरावण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आंदोलक नेत्यांनी केले. इंपेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर न करता राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्ष अकारण केंद्र सरकारवर तोंडसुख घेत असल्याचा भाजप नेत्यांनी यावेळी आरोप केला.
भिवंडीत भाजपाचे चक्काजाम आंदोलन काही काळ वाहतूक विस्कळीत
ओबीसी आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार भिवंडी शहरातील वर्दळीच्या कल्याण नाका परिसरात भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओबीसी विभागाने चक्का जाम आंदोलन केले .या आंदोलनात सहभागी स्त्री पुरुष कार्यकर्त्यानी रस्त्यावर बसकण मारल्याने या परिसरातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. तर मुंबई नाशिक महामार्गावरील राजनोली नाका या ठिकाणी खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले .या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबई नाशिक महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . सुमारे अर्धा तास आंदोलन सुरु होता त्यामुळे महामार्गावर काही काळ खोळंबा झाला होता. आंदोलन संपल्यावर पोलिसांनी आंदोलकांना पांगवीत वाहतूक सुरळीत केली आहे.
नवी मुंबईत चक्काजाम करणाऱ्या भाजपा नेत्यांना अटक
ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी आज भाजपाने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पनवेल ध्ये भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी रास्ता रोको केला. यावेळी मुख्य चौकात ठिय्या देत राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी भजोआ नेत्या चित्रा वाघ यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाशी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकार ने त्वरित योग्य तो निर्णय घेत ओबीसींचे आरक्षण परत मिळवून द्यावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.