Euro Cup 2020 स्पर्धेतील इंग्लंडच्या विजयाला वादाची किनार; पेनल्टीवेळी डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्याने संताप
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
यूरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र या विजयाला वादाची झळ पोहोचली आहे. ९० मिनिटांचा खेळ बरोबरीत सुटल्याने अतिरिक्त वेळ देण्यात आला. या वेळेत हॅरी केननं निर्णायक गोल झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला. १०४ व्या मिनिटाला हॅरीनं हा गोल झळकावला. मात्र हा झळकावण्यापूर्वी डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पेनल्टी दिल्याने डेन्मार्कचा गोलकिपर कॅस्पर श्मायकल गोल अडवण्यासाठी सज्ज होता. मात्र प्रेक्षकांमधून कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट मारला. प्रेक्षकांमधून केलेल्या या कृतीमुळे आता क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ही कृत्य प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या इंग्लंडच्या फॅननं केलं असावं, असा अंदाज बांधला जात आहे.
डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्यानंतर त्याचं लक्ष विचलीत झालं, असं डेन्मार्कच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीतही गोलकिपरनं बॉल अडवला. याप्रकरणी सोशल मीडियावर इंग्लंड आणि डेन्मार्कचे चाहते भिडले आहेत. “आंतरराष्ट्रीय या सामन्यात अशाप्रकारचं कृत्य योग्य नाही. मैदानात प्रेक्षकांना लेझर लाईट आणण्याची अनुमती कशी दिली?”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. खेळ सुरु असताना दुसरा फुटबॉल मैदानात आल्यानेही वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे स्टर्लिंगची पेनल्टीवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे. रिप्लेमध्ये मैदानात दुसरा बॉल आल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी खेळ काही क्षण थांबवायला हवा होता, असं मत नेटकऱ्यांनी उपस्थित केलं आहे.