शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा स्वबळावर लढणार! खासदार संजय राउत यांची मोठे विधान; हेरगिरीवर म्हणाले- देश सुरक्षित हातांमध्ये नाहीच
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राउत यांनी गुरुवारी मोठे विधान केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे राउत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या माहितीप्रमाणे, संजय राउत यांनी उत्तर प्रदेश विधानसभा आमची जेवढी ताकद आहे, तेवढ्या ताकदीने लढणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राउत म्हणाले, की उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. आमची जेवढी ताकद आहे, तेवढ्या ताकदीने लढणार आहोत. दिल्लीत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान, दिल्लीत असताना संजय राउत यांनी पेगागस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला आणि केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला.
देश सुरक्षित हातांमध्ये नाही
पेगासस प्रकरणावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशानात रोज गदारोळ सुरू आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून होणाऱ्या हेरगिरीवर चर्चेची मागणी करत आहेत. पण, सरकार यासाठी तयार दिसत नाही. यात केंद्र सरकारकडून चर्चेविनाच विधेयके देखील मंजूर केली जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राउत म्हणाले, की देश सुरक्षित हातांमध्ये नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा पेगाससवर चर्चेसाठी 3 तासांचा वेळ देऊ शकत नाही का? सरकारलाच संसद चालू द्यायची नाही. सरकारला संसदेत गोंधळ निर्माण करायचा आहे. त्यांना पेगाससचे सत्य ऐकण्याची भीती आहे. केंद्र सरकारला संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. तसेच कृषी कायद्यांवर सुद्धा चर्चा व्हावी आणि मोदी-शहा संसदेत उपस्थित राहावे असेही राउत म्हणाले आहेत.
आधी एकत्र यावे नेता नंतर ठरवू
देशात सरकारविरोधी आघाडीवर संजय राउत यांनी सांगितल्याप्रमाणे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की सर्वांनी आधी एकत्र यावे. नेता कोण होणार हे नंतर ठरवले जाऊ शकते. संजय राउत यांनी शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणाचे भीष्म पितामाह म्हटले होते. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचे देखील कौतुक केले होते. हेच कौतुक सामनाच्या गुरुवारच्या अग्रलेखातही करण्यात आले आहे.