देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतही ईडीच्या रडावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. रेती, कोळसा आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. तरुण परमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (after anil deshmukh adv tarun parmar filed complaint against minister nitin raut to ED)
आरोप काय?
अॅड. तरुण परमार यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडे तक्रार केली आहे. या दोन्ही नेत्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती, कोळसा, जमिनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परमार यांच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ईडीने परमार यांना समन्स बजावून मुंबईला जवाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. या प्रकरणी ईडीला पुरावे दिल्याचा दावा परमार यांनी केला आहे.
आणखी कागदपत्रे घेणार?
परमार यांनी 28 जून रोजी ईडीला महत्त्वाची कागदपत्रे दिली आहेत. त्यांची ईडीने तीन तास चौकशीही केली. तसेच त्यांच्याकडून येत्या 5 जुलै रोजी अधिक कागदपत्रे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परमार यांना पुन्हा ईडीकडून बोलवणं येण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली.
कोण आहेत परमार?
तरुण परमार हे नागपूरमधील वकील आहेत. ते केंद्र सरकारच्या एमएसएमई विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्याविरोधातही तक्रार केली आहे. तसेच या घोटाळ्यात राऊत यांचा मुलगाही असल्याचा दावा परमार यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुनगंटीवार, दरेकर काय म्हणाले?
नितीन राऊत यांच्या विरोधात अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपहार केल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. यावर राज्याचे माजी अर्थमंत्री, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ तक्रारच महत्त्वाची नाही. यासंबंधी कागदपत्रे व निश्चित पुरावे असल्याशिवाय ही चौकशी गंभीर आहे, असं म्हटलं जाऊ शकत नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. तर, अशा प्रकारच्या तक्रारी नियमितपणे होत असतात. या देशात कुणीही कुणाची तक्रार करू शकतो. यंत्रणा त्या संदर्भात तपास करत असतात, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.