संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत बैठकीचे आयोजन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सांगली : गतवर्षी अचूक नियोजन करत पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थितीचा करेक्ट कार्यक्रम करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यंदाही संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत कंबर कसली आहे. पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीला स्वतः उतरले होते. जयंत पाटील यांना स्वतः अनेक अडचणींचा त्यावेळी सामना करावा लागला होता. म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता जयंत पाटील यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अलर्ट केली आहे. या बैठकीला कृष्णा खोरे कार्यकारी संचालक मुंडे, मुख्य अभियंता गुणाले, राजपूत, सांगलीचे अधिक्षक अभियंता नाईक,पुणे अधिक्षक अभियंता चोपडे, प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.