रुग्णालयाचे उंबरठे झिजवण्यात ६ दिवसीय करोनाबाधित बाळाचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पालघर : करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेचा प्रश्न अधोरेखित होत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावं लागलं. मात्र लाट ओसरत असली तरी काही भागात प्रश्न जैसे थेच आहे. पालघर जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. सहा दिवसीय करोनाबाधित बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर यासाठी बाळाच्या आई-वडील आणि नातेवाईकांना तीन रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळ्यात असलेल्या एका खासगी रुग्णालयात ३१ मे रोजी एका बाळाचा जन्म झाला. बाळाची मूदतपूर्व प्रसूती असल्याने त्याचं वजन कमी होतं. त्यामुळे त्याला चांगल्या उपचारासाठी पालघरमधील एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे गेल्यानंतर बाळाची आई आणि बाळाची करोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये आईचा रिपोर्ट निगेटीव्ह, तर बाळाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यांनंतर त्यांना तात्काळ पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. मात्र तिथेही योग्य सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र यात बाळाची प्रकृती खालावत गेली. जव्हारमध्येही वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करणयात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी ६ दिवसांच्या बाळाने अखेरचा श्वास घेतला.