साताऱ्याच्या पठ्ठ्याचं पंतप्रधान मोदींकडून तोंडभरुन कौतुक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ जून) 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर बोलताना त्यांनी टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंचेही तोंडभरुन कौतुक केले आहे. पात्र खेळाडूंपैकी एक असलेला मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधव याच्या संघर्षात्मक प्रवासाचीही त्यांनी दखल घेतली आहे. यावर्षी टोकियोमध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिकचे आयोजन होणार आहे.
प्रवीणबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातून आलेला प्रवीण जाधव हा एक उत्कृष्ट तिरंदाज आहे. त्याचे पालक मजुरी करुन घर चालवतात. आता एका सामान्य मजुराजा मुलगा पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अतिशय गौरवाची बाब आहे.
स्वत: पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतलेल्या २४ वर्षीय प्रवीण जाधवला आज भारतातील सर्वश्रेष्ठ तिरंदाजांमध्ये गणले जाते. परंतु याच प्रवीणला १० वर्षांपुर्वी तिरंदाजी म्हणजे नक्की काय असते? हेसुद्धा माहिती नव्हते. प्रवीण साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील छोट्याशा सराडे गावचा राहणारा. त्याचे वडील रमेश आणि आई दररोज मजदुरी करुन आपले कुटुंब चालवतात.
शालेय वयात क्रिडा शिक्षक असलेल्या विकास भुजबळ यांच्याकडून प्रवीणला क्रिडा क्षेत्रात कारकिर्द घडवण्याची प्रेरणा मिळाली. भुजबळ गुरुजी त्याला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सांगत असे. पुढे वयाच्या १२ व्या वर्षी त्याला अहमदनगर जिल्ह्यातील क्रिडा प्रबोधिनी, प्रवरनगर येथे भरती होण्याची संधी मिळाली. येथे धावणे, लांब उडी मारणे अशा स्पर्धांमध्ये सहभागी होता-होता तिरंदाजी क्षेत्रात त्याची निवड झाली.