स्वबळाचे नारे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सध्या राज्यात स्वबळावर लढण्याच्या चर्चा सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केल्या आहेत. त्यातल्या त्यात महत्वाची घोषणा आहे ती काँग्रेसचे नाना पटोले यांची. त्यांनी काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. अर्थात नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरीही काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती असलेल्यांना पटोले यांना धोरणविषयक भाष्य करण्याचा अधिकार नाहि, हे चांगले ठाऊक आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनीही लगेचच त्याला उत्तर देताना भाजप आणि काँग्रेस स्वबळावर लढणार असतील तर शिवसेनेलाही राष्ट्रवादीबरोबर एकत्र येऊन लढावे लागेल, असे म्हटले आहे. वास्तविक संजय राऊत यांनाही धोरणविषयक बोलण्याचा काहीही अधिकार नाहि. पटोले निदान प्रदेशाध्यक्ष तरी आहेत.राऊत यांच्याकडे तसले काही वैधानिक पदही नाहि. तरीही उगीचच राऊत बोलण्याची आपली भूमिका पार पाडत असतात. त्यातही राऊत यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीबरोबर एकत्र येऊन लढावे लागेल, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचा शिवसेनेबरोबर युती करून लढण्याचा अधिकृत असा काहीही निर्णय झालेला नाहि. केवळ पवार यांनी दोनतीन वक्तव्ये त्या अर्थाची केली आहेत. परंतु राजकारणात अशा वक्तव्यांना निर्णय घेतला जात नाहि, तोपर्यंत काहीही अर्थ नसतो. अर्थात राऊत यांनी काय बोलायचे, त्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु त्यांच्या या वक्तव्याला कुणी गांभिर्याने घेतले असेल, असे वाटत नाहि. कारण राष्ट्रवादी असो की शिवसेना, दोघांनाही एकहाती कधीही चांगेल यश मिळालेले नाहि. त्यांना सदोदित कोणत्या तरी पक्षाला लटकूनच सत्तेत रहावे लागले आहे. शिवसेनेला तर भाजपची साथ मिळाली नसती तर ती इतकी वर्षे सत्तेत राहू शकली नसती. आता तिने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे राष्ट्रीय नेत्यांच्या रांगेत मानले जातात. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रि ममता बॅनर्जी यांनी भाजपचा अपेक्षेपेक्षा दारूण पराभव करून राष्ट्रीय नेता म्हणून जी मुसंडी मारली आहे, त्यामुळे पवार हे बॅकफूटवर आपोआप गेले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे मान्य होणार नाहि. पवार यांच्यावर मोदींविरोधात राष्ट्रीय स्तरावर पक्षांची फळी उभारण्याची जबाबदारी असल्याचे मानले जात होते. परंतु त्यात पवार यशस्वी झाले नाहित. आता पवार यांची जागा कदाचित ममता यांनी घेतलेली असू शकते. त्यांना स्वतःलाही दिल्लीत जायचे आहे. राष्ट्रीय नेतृत्व त्यांना खुणावत आहे. यात पवारांचे महत्व नाहि म्हटले तरीही थोडे कमी झालेच आहे. तरीही पवार शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवतील, असे वाटत नाहि. कारण शिवसेनेबाबत जनतेत नाराजी आहे आणि मग शिवसेनेबद्दल असलेल्या नाराजीचा फटका केवळ पवारांच्या राष्ट्रवादीला खावा लागेल. अन्यथा काँग्रेस त्यात वाटेकरी राहिली असती. काँग्रेस आपली मान या आघाडीतून अलगद काढून घेऊ पहात आहे, हे चाणाक्ष पवारांच्या लक्षात आले नसेल, हे संभवत नाहि. काँग्रेस स्वबळावर लढण्याचे नारे का देत आहे, हे सांगणे सोपे आहे. काँग्रेसला आता चांगल्या जागा मिळण्याची संधी दिसते आहे. पेट्रोलच्या दरांनी गाठलेली शंभरी, कोविड परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, प्रचंड बेरोजगारीमुळे लोकांच्या मनात मोदी सरकारविरोधात असलेला राग यावर काँग्रेसला जनमत तयार करून चांगल्या जागा मिळवण्याची संधी भरपूर आहे. अशी संधी दिसत असताना आघाडी करून इतराना यात वाटेकरी करून घेणे काँग्रेसची राजकीय दिवाळखोरी ठरेल. म्हणून पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे विचार व्यक्त केले आहेत. यात गैर काहीच नाहि. परंतु शिवसेनेला ते यासाठी झोंबले आहेत कारण स्वबळावर लढण्याची ताकद एकट्या शिवसेनेतच नाहि. त्यांना सतत कुणा तरी मोठ्या पक्षाच्या आसर्यानेच रहावे लागते. अर्थात जोपर्यंत प्रत्यक्ष घोषणा होत नाहि, तोपर्यंत काहीही होत नाहि. भाजपचे शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट कधीच लपून राहिलेले नाहि आणि त्यांनी ते कधीही लपवून ठेवलेलेही नाहि. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहेच. भाजप आणि शिवसेना यांची युती आता कधीही होणार नाहि, हेही स्पष्ट आहे. अगदी राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, हे खरे असले तरीही भाजप आणि शिवसेना यांच्यात इतके वितुष्ट आले आहे की आता दोन्ही पक्ष माघार घेऊ शकत नाहित. मुंबई पालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी आहेत. त्यासाठी शिवसेना आणि भाजप हे जिवाच्या आकांताने जोर लावणार, हे निश्चित आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काय ते ठरवेल. तसेही काँग्रेसला संकुचित विचारांच्या वगैरे ज्या शिवसेनेबद्दल बोलले जात होते, त्या शिवसेनेशी निवडणुकीत आघाडी करणे परवडणारे नाहि.पक्षाच्या प्रतिमेला त्यामुळे जबरदस्त धक्का बसणार आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसला शिवसेनेबरोबर गेल्याचा जोरदार तडाखा बसला आहे, परंतु काँग्रेसचे नेतृत्व सध्या दिशाहीन झाले असल्याने त्यांना काय निर्णय घ्यावा, हे समजत नाहि. जितक्या लवकर काँग्रेस यातून धडा शिकेल, तितके ते त्या पक्षाच्या फायद्याचे होईल. स्वबळाचे नारे देऊन काँग्रेसने एक खडा टाकला आहे. यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटते, ते त्यांना पहायचे आहे. अधिकार नसलेल्या व्यक्तिंनी पक्षाच्या धोरणांबाबत बोलण्याकडे केवळ करमणूक म्हणून पहायला हवे. पटोले किंवा राऊत यांच्या विधानांकडे सध्या तरी दोन घटका करमणूक म्हणूनच पाहिले पाहिजे.