विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्ह, बार्टीची विजयी सलामी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लंडन : महिलांमध्ये अग्रमानांकित अॅश्ले बार्टी, अँजेलिक केर्बर आणि पुरुषांमध्ये चौथा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी आपापले सामने जिंकत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली, तर प्रतिस्पर्धी एड्रियन मॅनारिनोने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अनुभवी रॉजर फेडररने दुसरी फेरी गाठली.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेल्या बार्टीला विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतही संघर्ष करावा लागला. कर्करोगावर मात करत तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिने बार्टीला चांगलेच झुंजवले. अखेर बार्टीने ६-१, ६-७ (१/७), ६-१ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. २५व्या मानांकित केर्बरने निना स्टोजानोव्हिचचा ६-४, ६-३ असा सहज पराभव केला. आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने तमारा झिदानसेकला ७-५, ६-४ अशा फरकाने नामोहरम केले.
गेल्या वर्षी फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या जर्मनीच्या झ्वेरेव्हने पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार केला. त्याने नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिकस्पूर याचे आव्हान ६-३, ६-४, ६-१ असे सहज परतवून लावले. दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरे याने २०१७नंतर विम्बल्डनच्या एकेरीतील पहिला सामना जिंकला. मरेने जॉर्जियाच्या निकोलोझ बासिलाश्विली याच्यावर चार सेटमध्ये ६-४, ६-३, ५-७, ६-३ अशी सरशी साधली.
सहाव्या मानांकित फेडररला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली. कारण मॅनारिनोने सामन्यातून माघारीचा निर्णय घेतला, तेव्हा ६-४, ६-७ (३-७), ३-६, ६-२, ०-० (१५/०) अशा फरकाने दोघांनीही प्रत्येकी दोन सेट जिंकले होते.