लसीकरणाचेही राजकीय लाभ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करावा आणि त्याचा विनाकारण गाजावाजा करून राजकीय लाभ कसा पदरात पाडून घ्यावा, हे शिकण्यासाठी भाजपची शिकवणीच लावावी लागेल. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला आणि या निमित्ताने देशात कोविड प्रतिबंधक लसी टोचण्याचा विक्रम करण्यात आला. वास्तविक मोदींचा वाढदिवस ही निसर्गनियमानुसार घडणारी घटना असली तरीही त्याचा संबंध लसीकरणाशी जोडून भाजपने याचाही राजकीय इव्हेंट केला. यात काही गैर नसले तरीही भाजपच्या जाहिरातबाजीचे एक वेगळे प्रत्यंतर आलेच. मोदींच्या वाढदिवशी एकाच दिवसात २ कोटी लोकांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. भारतासारख्या देशात आरोग्य यंत्रणा हा पराक्रम करू शकली, हे खरेतर कौतुकास्पद आहेच. पण त्याचा इव्हेंट करणे कितपत योग्य, हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे. अर्थात ज्या देशात नेत्यांच्या वाढदिवशी रूग्णांना फळेवाटप वगैरे कार्यक्रम करण्यात येतात, त्या देशात हे प्रकार व्हावे, हे स्वाभाविकच झाले. नरेंद्र मोदी यानीही असा विक्रम करणारे ड़ॉक्टर, परिचारिका आदींचे अभिनंदन केले. ते ठीकच झाले. यानिमित्ताने भारताने एक वेगळाच टप्पा ओलांडला आणि भारताच्या कार्यक्षमतेचे जगाला प्रत्यंतर आणून दिले, याचेही कौतुक करावे लागेल. पण ही कार्यक्षमता एरवी का दाखवली जात नाहि, हाही प्रश्न आहेच. हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मेहनत घेण्यात आली. त्यात काहीच गैर नाहि. उलट कौतुकास्पद आहेच, कारण देशातील एक लाखांहून अधिक लसीकरण केंद्रांमधून २ कोटी लोकांचे लसीकरण एकाच दिवशी झाले. चिनने गेल्या ४ जून रोजी एकाच दिवशी २ कोटी ८ लाख लोकांना लसी टोचल्या होत्या. चिनलाही आपण आता मागे टाकले आहे. त्याबद्दल भारतीय आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करतानाच, दुसर्या दिवसापासूनच लसीकरणाची गति का मंदावली, हाही एक प्रश्न मनात उभा रहातो. १६ जानेवारीपासून सुरू असलेल्या लसीकरण अभियानात सध्या १८ वर्षांखालील नागरिक सोडून सर्वांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आकडेवारीतून सांगायचे तर, एकूण ७८ कोटी ९६ लाख लोकांना लस दिली आहे. १९ कोटी ६२ लाख लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. भारतासारख्या देशात जेथे दोन शहरांत लाखो किलोमीटरचे अंतर असते, तेथे आरोग्य यंत्रणेने अगदी दुर्गम भागात जाऊन लोकांना लसीच्या मात्रा दिल्या आहेत. पाश्चात्य देशात तर दोन्ही डोस घेऊन तिसरा बुस्टर डोस देण्याची चर्चा सुरू आहे. भारतात तर याची चर्चाही सुरू नाहि. कारण भारतातील औषध कंपन्यांची दोन डोस देण्याबाबतच क्षमता नाहि. तिसर्या बुस्टर डोसची शक्यता तर अजून धूसरच आहे. पण अस्वस्थ करणारी गोष्ट ही आहे की, मोदींच्या वाढदिवशी जे लसीकरण विद्युत वेगाने राबवण्यात आले, त्याच्या दुसर्या दिवसापासूनच त्याची गति मंद का झाली. आता लहान मुलांना संसर्ग करून त्यांना आपल्या विळख्यात घेणार्या तिसर्या लाटेची खूप चर्चा होत आहे. परंतु लहान मुलांना लस देण्याबाबत अजूनही काही हालचाल नाहिच. केवळ त्यांच्यासाठी योग्य लसीची अंतिम चाचणीच अजूनही होत आहे. जरी ही लस बाजारात आली तरीही ती देण्याची सुरूवात या महिन्याच्या अखेरीनंतरच केली जाईल. कारण तज्ञांचे म्हणणे ऑक्टोबरमध्येच तिसरी लाट य़ेऊ शकते, असे आहे. अर्थात मोदींच्या वाढदिवशी जो विक्रम करण्यात आला, त्याचे महत्व नाकारण्याचा मुळीच उद्देष्य नाहि. मोदींच्या वाढदिवशी विक्रमी लसीकरण करण्याने राजकीय इव्हेंट करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसला असला आणि त्यामागे उत्तरप्रदेश आणि पंजाबातील आगामी निवडणुका हे कारण असले तरीही, केवळ वाढदिवशी सरकारने केलेली कामगिरी आणि आत्मप्रशंसेने भरलेली भाषणे करण्यापेक्षा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला गेला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मोदींनीही या लसीकरण विक्रमाला आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कारण दोन वर्षांपासून देश कोविडच्या संकटाशी लढत आहे. त्यामुळे हे संकट परतवून लावण्याच्या या मोहिमेच्या बाबतीत विक्रम करणे हे निश्चितच राष्ट्रासमोर प्राधान्य काय आहे, याची जाणिव असल्याचे लक्षण आहे. परंतु मोदींच्या वाढदिवसानंतर दुसर्याच दिवसापासून लसीकरणाची गति का मंद झाली, याबाबत काहीही योग्य असे स्पष्टीकरण मिळत नाहि. यातून प्रश्न उभा रहातो की, या वर्षाच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण(किमान एक डोस तरी) करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. ते पूर्ण होऊ शकणार नाहि. हे लक्ष्य पूर्ण होईल की नाहि, याचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे. पण तज्ञांनी अशा लसी बनवाव्यात की ज्यामुळे दोन्ही डोस घेतल्यानंतर तरी नागरिक या रोगाच्या विळख्यात येऊ नयेत. पण तेही झालेले नाहि, असे दिसते आहे. कारण अनेकांना दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. केवळ लस घेतल्याने मृत्यु येत नाहि, हा एकमेव दिलासा असल्याचे सांगण्यात येत आहे. पण हे तरी कितपत खरे आहे, हे समजण्यास काही मार्ग नाहि. कारण मृत्यु दडवण्याचा आपला लौकिक कायमच आहे. उत्सवप्रेमी लोकांमध्ये आता सामाजिक अंतर पाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहेच. पण यासोबतच लसीकरण अभियानाची गति वाढली तरच तिचा सकारात्मक परिणाम होणार आहे. याबाबतीत सरकार आणि आरोग्य यंत्रणेने भर द्यायला हवा. यासाठी कुणाच्याही वाढदिवसाची गरज लागू नये. लसीकरणाच्या विक्रमाचे ज्या कुणाला लाभ घ्यायचे असतील ते त्याला घेऊ द्या. पण लोकांचे लसीकरणामुळे जीव वाचतील, हे पहाणे महत्वाचे आहे.