मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी… लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही सोसायटीमध्येच घेता येणार लस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : लवकरच मुंबईकरांना त्यांच्या सोसायटीमध्येच करोनाची लस उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरांमधील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी दिली आहे. सोसायटीच्या आवारामध्ये रुग्णालयांशी बोलून लसीकरण मोहीम राबवता येणार आहे. मात्र यासाठी पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध आहेत का याबरोबरच करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केलं जात आहे का याकडेही रुग्णालांनी लक्ष देणं बंधनकारक आहे. या लसीकरण मोहिमेचे दर सरकारने खासगी रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले आहेत. यासंदर्भात काही सोसायट्यांनी महापालिकेसोबत चर्चा सुरु केली आहे तर काही सोसायट्यांनी स्वत: लसीकरणासाठी लागणारी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरु केलीय.
अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), सुरेश कलानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. गृहसंकुले, इंडस्ट्रीयल पार्क, बँका, मोठ्या कंपन्या कोणत्याही खासगी रुग्णालयासोबत टायअप करुन त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवारामध्ये लसीकरण करु शकतात, असं कलानी म्हणाले. “आम्ही लसीकरणासाठी ७५ खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अर्ज येतील त्याप्रमाणे इतर रुग्णालयांनाही आम्ही परवानगी देऊ. रुग्णालयांनी ही लसीकरण केंद्र उभारताना वाट पाहण्यासाठी रांगेत असणाऱ्यांसाठी जागा, लसीकरण, लसीकरणानंतर ऑबझर्व्हेशन एरिया यासारख्या गोष्टींबरोबर लसीकरणासंदर्भात इतर नियम पाळणे बंधनकारक अशणार आहे. ज्यांना मोफत लस हवी आहे ते बीएमसीने उभारलेल्या २२७ लसीकरण केंद्रावरुन ती घेऊ शकतात. या केंद्रामध्ये मोफत लस मिळेल पण लसींचा पुरवठा झाल्यानंतरच ही केंद्र सुरु होतील,” असं कलानी यांनी स्पष्ट केलं आङे. लोढा ग्रुपने आपल्या सर्व रहिवासी संकुलांमधील नागरिकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये आम्ही लसीकरणासंदर्भात संबंधित संस्थांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. आम्ही स्थानिक महानगरपालिकांकडून यासंदर्भातील परवानगी मिळवण्यासाठी चर्चा करत आहोत. “आम्ही स्थानिक खासगी रुग्णालयांसोबत लसीकरणासंदर्भातील करार केलाय,” असं लोढाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.