“धीर सोडू नका”, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन, प्रशासनाला दिले तातडीचे निर्देश!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं. त्यामुळे आता पुढे काय? असा यक्षप्रश्न समोर उभा ठाकलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा देणारं आवाहन केलं आहे. “आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
तातडीने मदत पोहोचवा
“कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे. तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 26 मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.
नुकसानीचे पंचनामे सुरू करा
“सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत”, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. “सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतपrक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
“निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
Mumbai Lakshadeep