भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गांधीनगर : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत वेगवान राजकीय घडामोडीनंतर सोमवारी गुजरात भाजपचे जेष्ठ नेते आणि आमदार भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तसेच नियुक्तीबद्दल अभिनंदन आणि स्वागत-सत्कार केला.
यावेळी केंद्रीय गृह-सहकार मंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह, केंद्रीय निरीक्षक प्रल्हाद जोशी, नरेंद्र सिंह तोमर मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, भूपेंद्र यादव, दर्शन जर्दोश, भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील, राष्ट्रीय संगठन मंत्री बी एल संतोष , गुजरात संगठन मंत्री रत्नाकर आणि सर्व आमदार तसेच भूपेंद्र पटेल यांच्या परिवाराचे -सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, डॉ प्रमोद सावंत, मनोहर लाल खट्टर यांनी देखील कार्यक्रमात भाग घेतला.
2017 साली घाटलोडिया मतदार संघातून भूपेंद्र पटेल पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. स्वच्छ प्रतिमा असलेल्या भूपेंद्र पटेल यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असून ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. आमदार होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल यांनी महानगर पालिकेत विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. दादा म्हणून प्रसिद्ध भूपेंद्र पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तसेच आनंदीबेन पटेल यांचे विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी सकाळी कार्यकारी मुख्यमंत्री विजय रुपाणी तसेच उप- मुख्यमंत्री नितीन पटेल यांची त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद प्राप्त केले.
रविवारी विजय रुपाणी यांचा उत्तरार्धी निश्चित करण्यासाठी तसेच नूतन नेतृत्वावर मंथन आणि चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल करण्यात आला. 2016 ऑगस्ट पासून विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री होते.