विचारधारांचे काय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
आजचे राजकारण अगोदर राजकीय विचारधारांचा बळी दिला जातो आणि मग खेळले जाते. अर्थात विचारधारा टिकवून त्यावर ठाम रहाणे ही सोपी गोष्ट नाहि. ती खरेतर एकप्रकारे तपश्चर्या आहे. ती कुणालाच जमत नाहि. अगदी एखाद्याच पक्षाला जसे की डाव्या पक्षांना ती जमली. मात्र त्यांना त्याचा फटकाही बसला. विचारधारांना चिकटून रहाण्यामुळे डावे बदलत्या काळाच्या बदलत्या गरजांपासून अलग पडले आणि अखेरीस राजकीय पटलावरून नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत. बंगाल ही डाव्यांची भूमी होती. सलग चौतीस वर्षे त्यानी बंगालवर राज्य केले. ते कशा प्रकारे केले ते सारे आता गौण आहे. परंतु डाव्यांची सत्ता अखेर उलथली गेली. विचारधारांचा बळी सर्वांनी दिला आणि पक्षांतरेही केली. कालपर्यंत आपण जे विचार मांडत होतो, त्याच्या नेमके विरोधात आज बोलत आहोत, याबद्दल कुणालाही कसलीही खंत आज वाटत नाहित. नुकतेच भाजपमध्ये दाखल केलेले काँग्रेसचे उत्तरप्रदेशातील एक महत्वाचे नेते जितेन प्रसाद यांनी आपल्या मुलाखतीत हाच मुद्दा सरळपणे मांडला आहे. प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना वैचारिक तडजोड केली, असा आरोप त्यांच्यावर काँग्रेसमधील नेत्यांनी केला. त्याला उत्तर देताना प्रसाद यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. त्यांच्या मते,काँग्रेसने वर्षानुवर्ष ज्या शिवसेनेच्या संकुचित राष्ट्रवादाविरोधात भूमिका घेतली, त्याच काँग्रेसने महाराष्ट्रात सत्तेसाठी त्याच शिवसेनेशी युती केली. यात कुठे आली आहे वैचारिक जपणूक, हे त्यांच्या मुलाखतीचे सार आहे. काँग्रेसने केरळमध्ये डाव्या आघाडीविरोधात मुख्य विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्याच काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी युती करून निवडणूक लढवली. अखेर दोघेही या निवडणुकीत बरबाद झाले, ही गोष्ट अलाहिदा. पण वस्तुस्थिती जितेन प्रसाद यांनी सांगितली तसेच आहे, हे नाकारता येत नाहिच. महाराष्ट्रात तरी शिवसेना पंचवीस वर्षे युतीत सडली असे म्हणून पुन्हा त्याच भाजपशी युती करून निवडणूक लढवेल, मोदी यांच्या नावावर खासदारांच्या जागा मिळवेल, विधानसभेत पुन्हा महायुतीच्या नावावर मते मागेल आणि अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी या नैसर्गिक शत्रुंच्या बरोबर जाईल, हे तरी कुठे कुणाला माहित होते. राजकीय विचारधारा हा एक राजकीय पक्षांचा मुखवटा आहे, हे सर्वच विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेने सिद्ध केले आहे. उद्या कदाचित दोन्ही पक्ष वेगळे होऊन पुन्हा एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील आणि विरोधी म्हणूनही विधानसभेत बसतील. जितेन प्रसाद यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. आणखी एक या विचारधारेचा विनोद असा की, काँग्रेस राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत आहे आणि तरीही काँग्रेसचे नेते मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवेल, असे सांगत आहेत. यात कुठेच विचारधारेचा काही मुद्दाच नाहि. मुद्दा आहे तो राजकीय सोयीचा आणि जिंकून येऊन आपापली ताकद वाढवण्याचा. यासाठी राजकीय विचारधारा हे सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेले एक सोंग आहे. उत्तरप्रदेशात आता पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. अत्यंत महत्वाचे असे हे राज्य असल्याने कारण या राज्यातून पंतप्रधानपदाचा रस्ता जातो, हे राज्य जिंकण्यासाठी सारेच पक्ष ज्या काही तडजोडी करतील, त्या कल्पनेपलिकडे असतील. केवळ काँग्रेस आणि भाजप हेच दोन पक्ष एकत्र येणार नाहित. कारण ते अशक्य आहे कारण दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर हाडवैरी आहेत. अन्यथा कोणता पक्ष कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाईल, हे सांगणे अवघड आहे. जितेन प्रसाद यांना हेच सुचवायचे आहे. काँग्रेस आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेली आहे, हे जितेन प्रसाद यांचे म्हणणे खरेच आहे. परंतु एक मुद्दा त्यांच्या विरोधकांच्या हातातही आहेच. जर प्रसाद यांना काँग्रेस आणि शिवसेना यांची युती मान्य नव्हती तर त्यांनीच या मुद्यावर राजीनामा देऊन दुसर्या पक्षात का गेले नाहित. कदाचित त्यांना त्यावेळी ही विचारधारेची तडजोड फारशी आक्षेपार्ह वाटत नसावी, जितकी त्याना आज वाटत आहे. बाकी काँग्रेस असो किंवा शिवसेना किंवा इतर कोणताही राजकीय पक्ष, विचारधारेची तडजोड वगैरे विचारही त्यांच्या मनात नसतात. त्यांना मिळत असलेली सत्ता हीच दिसत असते. राजकीय विचारधारा वगैरेबद्दल नेत्यांना विचारणे म्हणजे हास्यास्पद आहे. सत्ता हाच प्रथम विचार आहे आणि बाकी सारे मुद्दे गौण आहेत, हे त्यांना मनोमन मान्य असते. पण इतके उघड बोलता येत नाहि, इतकीच त्यांची मजबुरी असते. तरीही लोक काय काढायचा तो अर्थ काढतातच. अन्यथा ज्या सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्यावर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली, त्याच पक्षाच्या साथीने पंधरा वर्षे राज्यात सत्ता भोगलीच की. राजकीय विचारधारा वगैरे आता दुर्मिळ मुद्दा झाला आहे आणि केवळ सत्ता आणि त्यासाठी वापरायचे मार्ग यात कोणतीही कसूर शिल्लक ठेवायची नाहि, हीच आजची विचारधारा आहे. जितेन प्रसाद यांनी काँग्रेसच्या डोळ्यात झणझणीत अंजन मात्र घातले आहे. शिवसेना हा एका कुटुंबाचा पक्ष असल्याने त्यांच्याबाबतीत विचारधारा वगैरे सोयीनुसार बदलता येते. ती सोय त्यांना आहे. पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने एका लहान पक्षाच्या मार्गाने जावे, हे राष्ट्रीय पक्षाला शोभणारे नाहि.