‘तौते’चे बळी! ‘पी-३०५’वरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह अरबी समुद्रातून काढले बाहेर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : तौते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा
तडाखा बसला. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफ्याचा नांगर वाहवत गेला आणि
तराफा भरकटला. त्यानंतर तराफा बुडल्याची माहिती समोर आली होती. तराफ्यावरून एसओपी
संदेश मिळाल्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध
मोहीम हाती घेतली. बुधवारी सकाळपर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं. तर
आता १४ जण मरण पावले असल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाला अरबी समुद्रात १४
कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाले असून, हे मृतदेह मुंबई डॉकयार्ड आणण्यात येत आहेत.
सोमवारी मुंबईजवळ अरबी समुद्रात तौते चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. या चक्रीवादळाचा
फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनाही बसला. पण, सर्वाधिक फटका बसला, तो ‘बॉम्बे हाय’
या तेल उत्खनन होत असलेल्या क्षेत्राला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून ओएनजीसीच्या
सेवेत असलेल्या ‘पी ३०५’ तराफा बुडाला. मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर
बुडाला. तराफा बुडून कर्मचारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आलं असून,
आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह नौदलाला मिळाले आहेत.
शोध मोहिमेचे कमांडर आणि नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख एमके झा यांनी १४ मृतदेह
सापडल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतदेह सापडलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्याचे
काम सुरू आहे. पी-३०५ वरील बेपत्ता असलेल्यांचा मृत्यू झाल्याचं अद्याप कळू शकलेलं नाही,
असंही ते म्हणाले. पी ३०५ तराफ्यावरील ८९ कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध
घेण्याचं काम अजूनही सुरूच आहे. सोमवारी (१७ मे) पहाटे सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या
समुद्रामुळे तराफ्याचे नांगर तुटून ते समुद्रात भरकटले. भरकटलेला तराफा बुडत असल्याचं
अंदाज आल्यानं जीवरक्षक जॅकेट घालून कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. या
तराफ्यावरून सोमवारी सकाळी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला होता. नौदलाच्या युद्धनौका
मदतीसाठी पोहोचेपर्यंत अनेक तास कर्मचारी खवळलेल्या समुद्रात या जॅकेटच्या आधारे तरंगत
तग धरून होते. बुधवारी सकाळपर्यंत नौदलाला २७३ पैकी १८४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
आलं.