४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा २५, २६ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
औरंगाबाद, : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे रद्द झालेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत आयोजित करण्यात आले आहे. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली.
मराठवाड्यातील साहित्यप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येऊन 'लोकसंवाद फाउंडेशन' या संस्थेच्या वतीने या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले. कार्यकारिणीच्या या बैठकीत आयोजकांनी संमेलनाचे स्वरुप अगदी साधे असेल. कोणताही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात, साधेपणाने संमेलन कसे होईल, यावर चर्चा करून कमी खर्चात संमेलन घेण्याचा निर्धार केला.
लोकसंवाद फाऊंडेशनचे कार्यकर्ते संमेलनाच्या कामाला लागले असून त्यासाठी बँकेत संमेलनाचे स्वतंत्र खातेही उघडले आहे. उस्मानाबाद येथील संमेलनाप्रमाणेच हे संमेलनदेखील पूर्णपणे लोकवर्गणीतून घ्यावे, असा संकल्प मराठवाडा साहित्य परिषद व लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे रसिक वाचकांनी यथाशक्ती आर्थिक मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार आणि महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाचे नियम पाळूनच हे संमेलन घेण्यात येईल, अशी ग्वाही लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. तसेच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील. यापूर्वीचे ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन जालन्यात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद दत्ता भगत यांनी भूषवले होते.