कुस्तीपटू प्रिया मलिकची सुवर्ण कमाई, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जागतिक कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू प्रिया मलिकने ७५ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यामुळे वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या हाती मोठे यश लागले आहे.
प्रियाने स्पर्धेत बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत केले. अवघ्या ३२ वर्षांच्या प्रियाने हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत विजयाची मोहोर उमटवत भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. या आधी मीराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आता प्रियाने मिळवलेल्या सुवर्ण पदकामुळे देशभरात आनंद व्यक्त होत आहे.
प्रिया मलिक हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील असून चौधरी भरतसिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूल निदानीची विद्यार्थीनी आहे. प्रियाचे वडील जय भगवान निदानी भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तिच्या यशात प्रशिक्षक अंशु मलिक यांनी मोठी भूमिका साकारली आहे. याआधी प्रियाने २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्ण पदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाच्या सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिचं अभिनंदन.”