अनिल देशमुखांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज, शुक्रवारी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली. नागपुरातील जीपीओ चौकातील देशमुखांच्या निवासस्थानी आणि वर्धा मार्गावरील हॉटेल ट्राव्होटेल येथे एकाच वेळी इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाने देशमुखांकडे धाड टाकली आहे.
देशमुख यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. असे असले तरी देशमुख यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं तपास यंत्रणांचे काम सुरूच आहे. याचाच भाग म्हणून आज नागपूर येथील घरी छापे मारण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागानं छापे टाकले तेव्हा अनिल देशमुख व त्यांची दोन्ही मुले घरी नव्हती. त्यांच्या पत्नी व काही खासगी कर्मचारी घरी होते. एंटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही या प्रकरणात जावे लागले. त्यामुळं संतापलेल्या सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटीं रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे व अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.