३ लाख युवक-युवतींना मिळणार बँकींग,फायनान्स सर्व्हिसेस,इन्शुरन्सचे प्रशिक्षण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे कौशल्य विकास मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.
कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन त्याचे हस्तांतर केले. आयसीएआय ही केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयांतर्गत कार्यान्वित संस्था आहे.या उपक्रमांतर्गत पुढील ३ वर्षात राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग,व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराईज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणारे हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल. राज्य शासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे. आयसीएआयद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करुन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, कोरोना आणि इतर आर्थिक संकटामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वित्तीय क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी आहे. आज झालेल्या सामंजस्य करारातून आणि त्याद्वारे राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणाऱ्या प्रशिक्षणातून कुशल मनुष्यबळ ही कमतरता होईल. या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील विशेषत: वंचित घटकांपर्यंतही हे प्रशिक्षण पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि वाढत्या आर्थिक क्षेत्राची गरज पाहता हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. मुलींना तसेच सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील युवक-युवतींना हे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आधी चो-या आता बहाणे! प्रवीण दरेकर यांचे नवाब मलिकांना उत्तर
मुंबई । भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चो-या-आता बहाणे असा प्रकार आहे, अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.
स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत ? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चो-या नंतर बहाणे अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी 36 नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.