सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई,: सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सोमवारी (दि. 27) राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. सिंगापूरची स्वतःची गृहबाजारपेठ नसल्यामुळे मुंबईतील आपल्या कार्यकाळात सिंगापूर व भारतातील आर्थिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे नवे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी राज्यपालांना सांगितले. भारतातील अनेक विद्यार्थी सिंगापूर येथे उच्च शिक्षण घेत असून सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा कल मात्र इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शिक्षण घेण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेल्याचे मावळते वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपालांना सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे आपण प्रशिक्षण घेतले असल्यामुळे संपूर्ण भारत आपल्या परिचयाचा असल्याचे गेविन चॅय यांनी सांगितले.
यावेळी सिंगापूरचे मुंबईतील उप वाणिज्यदूत (राजकीय) झॅकेयुस लिम उपस्थित होते.