शैली सिंहने रौप्यपदक जिंकत रचला नवीन इतिहास
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नैरोबी - भारताची अत्यंत प्रतिभावान असलेल्या शैली सिंहचे रविवारी येथे लांब उडी स्पर्धेत केवळ 1 से.मी. अंतर कमी पडल्याने सुवर्णपदक हुकले. जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स स्पर्धेत शैली सिंहने रौप्यपदक जिंकत एक नवीन इतिहास रचला आहे. स्वीडच्या माजा अस्कागने सुवर्ण, तर युक्रेच्या मारिया होरिएलोव्हाने कांस्यपदकावर नाव कोरले.
17 वर्षीय शैली सिंहने केलेली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी सुवर्ण पदकासाठी कमी पडली. शैलीने 6.59 मिटर लांब उडी मारत रौप्यपदकावर नाव कोरले. तर युरोपियन कनिष्ठ विजेता ठरलेल्या स्वीडनच्या माजा अस्कागने अंतिम फेरीत 6.60 मीटर अव्वल स्थान मिळवले. शैली ही तिसऱ्या फेरीपर्यंत आघाडीवर होती. परंतु 18 वर्षीय अस्कागने चौथ्या फेरीत फक्त 1 से.मी.ने तिला मागे टाकले, जे शेवटी निर्णायक ठरले. युक्रेनच्या मारिया होरिएलोव्हाने 6.50 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक पटकावले.
या विजयानंतर शैली सिंह म्हणाली, मी 6.59 मीटर पेक्षा जास्त उडी मारून सुवर्ण जिंकू शकले असते. माझ्या आईने मला स्टेडियममध्ये गायल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताबद्दल सांगितले होते; पण मी ते करू शकले नाही, असे शैली म्हणाली.
मी अवघ्या 17 वर्षांची आहे. मला पुढील अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची महत्त्वकांक्षा आहे. पुढील वर्षी आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धाही आहेत आणि मला त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करायची असल्याचे तिने सांगितले.
शिंपी म्हणून काम करणाऱ्या एका आईने वाढवलेल्या आणि झाशीमध्ये जन्मलेल्या शैलीने बंगळुरू येथील अंजू बॉबी जॉर्जच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
तिला अंजूचे पती बॉबी जॉर्ज यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तिने जूनमध्ये राष्ट्रीय (वरिष्ठ) आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी स्पर्धा 6.48 मीटरची नोंद केली होती. जी मागील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. ती सध्याची जागतिक अंडर-18 क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.