लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून करोना लस देणार?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून करोना लस देणार?

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचा प्रभाव काही कमी झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे.

“करोनाची साखळी तोडण्यासाठी मुलांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. जायडस कॅडिलाने ट्रायल केलं आहे आणि आपतकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच ट्रायल ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल. दुसरीकडे फायझरच्या व्हॅक्सिनला अमेरिकेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून मुलांचं लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे”, असं एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील ४२ कोटीहून अधिक लोकांना करोना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. आतापर्यंत देशातील ६ टक्के लोकांना करोना लस देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यासाठी दिवसाला १ कोटी लस देणं गरजेचं आहे. मात्र सध्या ४० ते ५० लाख करोनाचे डोस दिले जात आहेत. तर आठवड्याच्या शेवटी लसीकरण मोहीम थंडावत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे अनेक देशांनी लहान मुलांना करोना लस देण्यासाठी आपतकालीन मंजुरी दिली आहे. मात्र भारतात अजुनही मंजुरी देण्यात आलेली नाही.