विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का? चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंची राज्य सरकारवर तोफ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे याबाबत बरीच राजकीय चर्चा सुरू झाली होती. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या श्रेयावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. खुद्द नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाचं श्रेय आमचं आहे, असं ठामपणे सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्घाटनाच्या भाषणात दावे-प्रतिदावे होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यावेळी नारायण राणेंनी केलेल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्यांनी केलेला विकासाबद्दल सांगितलं. “इथे ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचं नाव तिथे येऊच शकत नाही”, असं राणे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले राणे…
इथे येऊन राजकारण करू नये असं मला वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारं विमान डोळे भरून पाहावं या हेतूने मी आलो होतो. विमानं पाहून आनंद वाटला. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब भेटले. माझ्या कानात काहीतरी बोलले, पण मी त्यातला एकही शब्द ऐकला नाही. माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ९० साली मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तू जा, तुला मागणी आहे. मी निवडून आलो. मी हा जिल्हा पाहिला. जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला. उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलं.
95 साली शिवसेनेची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. देशातला एकमेव जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर इथे सर्व प्रकारच्या विकासासाठी तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. गोपीनाथ मुंडेंना सांगून ब्रीज आणि रस्त्यांसाठी 120 कोटी दिले.
राज्याच्या 10वी-12वीच्या निकालात पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गचे असतात. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळी शिवसेना होती. साहेबांचं श्रेय आहे. माझं नाही. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स करायचा, त्याचं क्रेडिट तो बॅटला द्यायचा. मी क्रेडिट घेतच नाही. मला सामान्यांसाठी काम करणं आवडतं. उद्धवजी, एक विनंती आहे. याच जागेवर मी आणि प्रभू 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होतं की भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. विरोध होत होता. किती विरोध होत होता. मी नावं घेतली तर राजकारण होईल.
अजित पवार साहेबांनी अधिग्रहणासाठी 100 कोटी रुपये दिले सीवर्ल्डच्या. पण काय झालं? कुणी रद्द केलं? कोण तिथे आंदोलन करत होतं? आहेत स्टेजवर. भांडं काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजताय तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचंय, तुम्ही आलात, मला बरं वाटलं.
सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी इथला अभ्यास करावा. 481 पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात. तुम्ही वाचावा आणि द्या त्यासाठी पैसे. धरणाला एक रुपया दिला नाही. माझ्या वेळी जेवढी धरणाची कामं झाली, त्याच्या पुढे आज काम गेलेलं नाही. काय विकास? इथेही एअरपोर्टला पाणी नाहीये. विजेची लाईन नाही. 34 कोटींचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झालं, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? हे खड्डे पाहावेत? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीनं करायला पाहिजे.