मी राजकारणात व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले - पंकजा मुंडे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असं मला वाटत नाही. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असं म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं.त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठिशी मी उभा राहणार आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. पायाला फोड आलेले असतांनाही पट्टया बांधून प्रचार केला हे विसरून चालणार नाही असे सांगतांना मुंडे साहेबांच्या आठवणीने त्या गहिवरून गेल्या. नेता महाराष्ट्राचा असतो, तो कोणत्या जातीचा नसतो त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलणं योग्य नाही असंही त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना सांगितलं.